Elgaar Parishad – पुणे पोलिसांची तपासातील भूमिका संशयास्पद! शरद पवार यांची चौकशीची मागणी

733

एल्गार परिषद आणि त्यानंतर भडकलेली भीमा-कोरेगांवची दंगल याप्रकरणी पुणे पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. या घटनेबाबत बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित केली आहे. ‘पोलीस आयुक्त आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी अधिकाराचा पूर्ण गैरवापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून या लोकांना तुरुंगात ढकलले आहे’ असा आरोप करत असतानाच शरद पवार यांनी या प्रकरणी निष्पक्ष अशी विशेष तपास समिती नेमावी अशी मागणी केली आहे.

शरद पवार यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की ‘एल्गार परिषदेत नामदेव ढसाळ आणि इतर काही कवींच्या कविता आणि त्यांचे अनुवाद म्हणण्यात आले. याचा अर्थ कोणी लगेच शहरे पेटवायला निघालंय असा होत नाही’. या प्रकरणी ज्यांच्यावर खटले दाखल करण्यात आले ते चळवळीतील आहे आणि त्यांनी टीका केली आहे. टीका केली म्हणून त्यांच्याविरूद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही असे शरद पवार यांनी म्हटले.

पोलिसांनी एल्गार परिषद आणि त्यानंतर उसळलेल्या दंगलीप्रकरणी गौतम नवलखा, वरवरा राव, सुधा भारद्वाज, अरुण परेरा व वर्नेन गोन्साल्विस,सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, रोना विल्सन, महेश राऊत यांना अटक केलेली आहे. या अटकेबाबत बोलत असताना शरद पवार म्हणाले की ‘पुणे पोलीस आय़ुक्तांचे या प्रकरणातील वागणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. पोलीस आय़ुक्त आणि त्यांचे काही सहकारी यांनी अधिकाराचा पूर्ण गैरवापर करून मूलभूत स्वातंत्र्यावर गदा आणून तुरुंगात ढकललेले आहे.’ यामुळे याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे पवार म्हणाले.

शरद पवार यांनी म्हटले की ‘माझा महाराष्ट्र सरकारला आग्रह असेल की त्यांनी निस्पृह आजी किंवा माजी अधिकारी अथवा आजी किंवा माजी न्यायाधीशांची नेमणूक करून विशेष तपास समिती नेमावी.’ ते पुढे म्हणाले की  ‘एल्गार परिषदेमध्ये अन्यायाविरोधात तीव्र मते मांडली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून महिनोंमहिने तुरुंगात डांबणे हे मूलभूत अधिकारांवर गदा आणणारे आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या