
सामना प्रतिनिधी । नाशिक
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच समाजासाठी विधायक भूमिका घेतली, सर्वसामान्यांच्या हिताची जपवणूक केली. त्यांचे हे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
नाशिक येथे क्रांतिवीर वसंतराव नाईक शैक्षणिक संस्थेच्या लोकनेते गोपीनाथराव मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उद्घाटन व गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवार बोलत होते. मुंडे यांनी शुन्यातून यश मिळविले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी संघर्ष केला, त्याचे राजकारण मात्र त्यांनी केले नाही. ऊसतोड कामगारांच्या समस्यांसाठी ते झटले. विरोधी पक्षनेते पदाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. साखर कारखाने त्यांनी यशस्वीपणे चालविले. ऊर्जा खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले, अशा शब्दात पवार यांनी मुंडे यांच्या कार्याचा गौरव केला. जुन्या आठवणींना उजाळा दिला. आम्हा दोघांची जन्मतारीख अन् नक्षत्र एक असल्याने आमचे राजकारणात सूत जुळले, असे त्यांनी मिष्कीलपणे सांगितले. शैक्षणिक संस्थेचा दर्जा टिकवून ठेवा. विद्यार्थी मिळतील आणि अडचणीही दूर होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुचविल्यानुसार पवार मेमोरियल ट्रस्टच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नाईक आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने या संस्थेत दोन शिष्यवृत्तींसाठी प्रत्येकी पंचवीस लाख रुपये देण्यात येतील. त्या रकमेच्या फिक्स डिपॉझिटच्या व्याजातून एक मुलगा व एक मुलगी यांना शिष्यवृत्ती द्यावी, असेही शरद पवार यांनी शेवटी सांगितले.
गोपीनाथ मुंडे हे माझे पिता होतेच, पण नेताही होते. त्यांच्यामुळेच मी राजकारणात यशस्वी होवू शकले. समाजातील वंचितांना न्याय देण्याचे काम मी करीतच राहील, अशा भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. मुंडे हे बहुजन समाजाच्या हितासाठीच्या चळवळीत खांद्याला खांदा लावून लढले. ओबीसीच्या जनगणनेचे त्यांचे कार्य अजून शिल्लक आहे, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. आमदार जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब थोरात यांनी आपले विचार मांडले. संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. यावेळी माजी मंत्री तुकाराम दिघोळे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सिमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ, अर्जुन टिळे, रवींद्र पगार, तानाजी जायभावे, दिलीप बनकर, रंजन ठाकरे, माणिकराव सोनवणे आदी हजर होते.

























































