
गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी संपाचा तिढा गुरुवारी सुटला. मात्र या संपासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जबाबदार असल्याचे सांगत एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने थेट शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक घरावर हल्लाबोल केला.
दरम्यान, या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळेही दाखल झाल्या. त्यांनी आधी संतप्त कर्मचाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कर्मचाऱ्यांची शांतपणे बोलायची तयारी असेल, तर मी त्यांचं म्हणणं आत्ता या क्षणी ऐकायला तयार आहे. पण माझी त्यांना नम्र विनंती आहे की हे सर्व शांततेच्या मार्गाने होऊ दे. तुम्ही शांत व्हा. दगडफेक करून आणि आमच्यावर चप्पलफेक करून प्रश्न सुटणार नाहीत. सगळे शांत असतील तर माझी चर्चेची बोलायची तयारी आहे, असं आवाहन आणि विनंती त्यांनी कर्मचाऱ्यांना केली.
काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्नही केला. मात्र, तिथे प्रचंड गोंधळ असल्याने सुळे यांना कर्मचाऱ्यांशी संवाद साधता आला नाही. माझे आई वडील आणि माझी मुलगी हे घरात आहेत, मला त्यांची सुरक्षितता पाहू द्या. मग मी तुमच्याशी बोलते, असंही त्या यावेळी म्हणाल्या.

























































