शरद पवारांना बेळगावात न येण्याची दिली होती धमकी, मग पवारांनी दाखवली महाराष्ट्राची पॉवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राचे लचके तोडण्याची भाषा करत सतत चिथावणीखोर विधाने करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात तेल ओतण्याचे काम केले आहे. मिंधे सरकारचे दोन मंत्री शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील हे कर्नाटकात जाणार होते, मात्र महाराष्ट्राच्या मंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही अशी धमकीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली होती. यामुळे महाराष्ट्राच्या या मंत्र्यांनी 6 डिसेंबरचा आपला दौरा रद्द केला होता. अशाच प्रकारची धमकी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही देण्यात आली होती, मात्र त्यांनी ही धमकी देणाऱ्यांना महाराष्ट्राची पॉवर काय आहे हे दाखवून दिलं होतं.

1986 साली बेळगावात परिस्थिती चिघळलेली होती. रामकृष्ण हेगडे हे त्यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. नारायण नावाचे पोलीस अधिकारी त्यावेळी बेळगावचे जिल्हा पोलीस प्रमुख होते. शरद पवार यांनी आपण बेळगावात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री हेगडे आणि जिल्हा पोलीस प्रमुख नारायण यांनी पवारांना बेळगावात पाय ठेवायचा नाही अशी धमकी दिली होती. कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांना बेळगावात येऊ द्यायचे नाही असा कर्नाटक सरकारने चंग बांधला होता.

सीमा लढ्याचे अभ्यासक, ज्येष्ठ वकील, कामगार नेते आणि बेळगावचे पहिले महापौर ॲड. नागेश सातेरी हे देखील या संघर्षाचा भाग होते. सातेरी यांनी म्हटलंय की कर्नाटक सरकारने दिलेल्या धमकीला न जुमानता त्यावेळी शरद पवार हे बेळगावात आले होते. बेळगावात त्यांनी सत्याग्रह केला होता. यावेळी चिडलेल्या पोलिसांनी मराठी भाषिकांवर लाठीचार्ज केला होता. पवारांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या सगळ्यांनी या लाठ्या झेलल्या होत्या असं सातेरी यांनी सांगितलं आहे. लाठीचार्जनंतरही हे मराठी भाषिक जुमानत नाहीत हे पाहून पोलिसांनी गोळीबार केला होता, मात्र तरीही शरद पवार आणि त्यांच्यासोबतचे साथीदार हटले नव्हते. या गोळीबारात काहींना आपले प्राण गमवावे लागल्याचे सातेरी यांनी म्हटलंय. या उग्र वातावरणामध्येही पवारांनी आपला सत्याग्रह यशस्वी करून दाखवल्याचे सातेरी यांनी सांगितलंय.

बेळगाव लाईव्ह या संकेतस्थळाशी बोलताना सातेरी यांनी म्हटले की, मुळात महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराजे देसाई यांना कर्नाटकात प्रवेश बंदीचा कर्नाटक सरकारने जारी केलेला आदेश बेकायदेशीर आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलमानुसार कोणताही नागरिक म्हणजे साधा सर्वसामान्य नागरीक ते मंत्र्यांपर्यंत कोणीही देशात कोठेही मुक्त संचार करू शकतो. हा घटनेने दिलेला अधिकार आहे असे सातेरी म्हणाले. यामुळे कर्नाटकात प्रवेश बंदीचा कर्नाटक सरकारने जारी केलेला आदेश बेकायदेशीर असून घटनेच्या कसोटीवर तो असफल ठरेल असे ते म्हणाले. मात्र असं असताना चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई हे उभयता बेळगावात येण्याची आपली दृढ मानसिकता बनवण्यात कमी पडले आहेत, कारण ते शरद पवार आणि छगन भुजबळ नाहीत हे लक्षात ठेवा, असे सातेरी यांनी म्हटले आहे.