महाविकास आघाडी अभेद्य; सत्तापरिवर्तन करणारच! शरद पवार यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सुरळीत सुरू असताना एकनाथ शिंदे आणि भाजपने खोके देऊन जे गद्दारीचे राजकारण केले ते राज्यातील सामान्य जनतेला आवडलेले नाही, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केला. दरम्यान, महाविकास आघाडी अभेद्य असून, राज्यात सत्तापरिवर्तन करणारच, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

अखिल भारतीय लोणारी महासंघाच्या वतीने सांगोला येथे आमदार रवींद्र धंगेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात शरद पवार बोलत हेते.

शरद पवार म्हणाले, जनता अतिवृष्टी, महागाई आणि शेतीमालाला भाव नसल्याने त्रस्त झाली आहे. अशावेळी सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे हे निवडणुकीत पैशांचा वापर, जाती-धर्माचा आधार तसेच अन्य विखारी प्रचार करून समाज अशांत करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, हा प्रयत्न महाविकास आघाडी कदापि सफल होऊ देणार नाही.

‘आम्ही झाडी डोंगारवाले गद्दार नाही, तर राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी बांधील असणारे महाविकास आघाडीचे खुद्दार आहोत’, असा टोला यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार शहाजीबापू पाटील यांचे नाव न घेता लगावला.

‘ईडी’ सरकारची इमेज कशी?
सावंतवाडीची पोरं म्हणाली, ‘आले गद्दार आले, खोकेवाले आले’
राज्यातील ‘ईडी’ सरकारबाबत जनतेच्या मनात काय भावना आहेत याबाबत बोलताना शरद पवार यांनी सावंतवाडी येथील एक किस्सा सांगितला. पवार म्हणाले, सावंतवाडीमध्ये शिक्षण क्षेत्रात काम करणारे माझे मित्र परत आले. मी त्यांना सरकार ज्यांच्या हातात आहे त्यांच्याबद्दल कोकणातील जनतेमध्ये काय भावना आहेत, असे विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी सावंतवाडीमध्ये फिरत असताना रस्त्यावरून तिरंगा लावलेली सरकारी गाडी गेली. त्यावेळी शाळेतील मुलं ‘आले गद्दार आले, खोकेवाले आले’ असं म्हणायला लागली. आता लहान मुलांच्या तोंडातही खोके आणि खोकेवाले हा शब्द बसला आहे. पवार यांनी हा किस्सा सांगताच लोकांनी टाळय़ांचा कडकडाट केला.