बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात शाळांना आवश्यक जागा उपलब्ध करून द्यावी! शरद पवार यांची सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात मुंबई महानगरपालिकेची शाळा तसेच मराठा मंदिर शाळा बाधित होत आहे. तेव्हा बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना सामाजिक जबाबदारी म्हणून सध्या असलेल्या शाळांना त्यांच्या गरजेनुसार जागा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी आज केली.

वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासात बाधित होत असलेल्या शाळांना जागा उपलब्ध करून देण्याबाबत आज ‘सह्याद्री’ अतिथीगृह येथे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत शरद पवारांनी पुनर्विकासासंदर्भात सूचना केल्या. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासात मुंबई महानगरपालिकेची शाळा तसेच मराठा मंदिर शाळा बाधित होत आहे. या शाळांना सामाजिक जबाबदारी म्हणून आवश्यक जागा उपलब्ध करून देणे हीच शासनाचीही भूमिका आहे. त्यानुसार नियोजन करावे, असे निर्देश मंत्री जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांनी म्हाडाच्या अधिकाऱयांना दिले.

एसएससी, सीबीएसई बोर्डाच्या अटी व शर्तींनुसार शाळांचे बांधकाम करावे

एसएससीसह सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी त्यांच्या अटी व शर्तीनुसार या शाळांचे बांधकाम करावे. ही इमारत बांधताना विद्यार्थ्यांना उपयुक्त अशी खेळती हवा, पाणी, स्वच्छतागृहे, मातीचे मैदान या सुविधांचा विचार करावा, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱयांना केल्या. संपूर्ण परिसराला या शाळांचा उपयोग होणार असल्याने त्याचा दर्जा उत्कृष्ट असावा, असेही ते म्हणाले. यावेळी प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, मुख्याधिकारी योगेश म्हसे आदी उपस्थित होते.