
हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केले. अमेरिकेने हिंदुस्थानकडून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरील करामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण मला एक ते दोन गोष्टींची चिंता वाटते. हिंदुस्थान आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराचे चित्र आणखी एक दोन दिवसांत स्पष्ट होईल. यानंतर सविस्तर भाष्य करणं योग्य ठरेल, असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, आता जे लोकांच्या समोर जे काही जाहीर करण्यात आले आहे, त्यावरुन अमेरिकेला आता कृषी क्षेत्रात हिंदुस्थानात निर्यात करता येईल, अशी तरतूद या करारात आहे. ही गोष्ट हिंदुस्थानी शेतकऱ्यांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखी आहे. अमेरिका हा एक शक्तिशाली देश आहे. त्यांची आर्थिक ताकद जास्त आहे. त्यामुळे त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या वस्तूचे उत्पादन अन्य देशांमध्ये निर्यात करायला सुरुवात केली तर त्याचा विपरीत परिणाम त्या देशाच्या संबंधित भागावर होतो. हिंदुस्थानी कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये, ही माझ्यासारख्यांची अपेक्षा आहे, असे शरद पवार म्हणाले.
शपथविधी झाला, संधी दिली, आनंद आहे!
शरद पवार यांनी सूनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरही प्रतिक्रिया दिली. परस्परांना धीर देणे आणि पुढे कसे जायचे याकडे आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही अधिकृतरित्या चर्चा केलेली नाही, शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे असे शरद पवार म्हणाले. तसेच ऑथेंटिक माहिती मिळत नाही तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
अजित पवार यांचे स्मारक उभारणार
अजित पवार यांचे स्मारक उभारण्याबाबत ते म्हणाले की, पेपरमध्ये वाचले की आम्ही स्मारक उभारणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असले पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू.


























































