
‘महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चालले आहे. सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही,’ असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला. सर्व पक्षांमध्ये सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
बारामती येथील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना आम्ही काही मुद्दय़ांवर एकत्र आलो आहोत. सरकार चालवताना काही प्रश्न निर्माण होत असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी यंत्रणा असावी अशी चर्चा झाली. या यंत्रणेत तीनही पक्षांचे नेते घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, काँग्रेसचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण हे समन्वय साधण्याचे काम करतात. कुठल्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी यंत्रणेतील सहा सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळे हे महाविकास आघाडी सरकार अत्यंत व्यवस्थित चालले आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
कुठलेही मतभेद नाहीत
काँग्रेसच्या स्वबळाच्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, तीनही पक्षांची सरकारमधील भूमिका हा एक भाग आहे, तर राजकीय पक्ष म्हणून संघटनेचे काम वाढवणे ही दुसरी बाजू आहे. राजकीय पक्षाला संघटनात्मक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हे स्वाभाविक आहे. हा प्रयत्न करण्यासंदर्भात आमच्या सर्व पक्षांचे सामंजस्य आहे. यात कुठलेही मतभेद नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.
…तर तो निर्णय स्वीकारावाच लागेल
दुसरीकडे, नगरसेवक, आमदार, खासदार यांना सहकारी बँकांचे कार्यकारी संचालक होता येणार नाही किंवा पूर्णवेळ संचालकदेखील होता येणार नाही, अशी नवीन नियमावली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)कडून लागू करण्यात आली आहे. त्यावर बोलताना ‘आरबीआय ही अर्थकारणावर आणि संबंधित संस्थांवर नियंत्रण असणारी संस्था आहे. धोरणात्मक निर्णय घेतला असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल; परंतु त्यांनी काही निर्णय घेतला असेल तर तो स्वीकारावाच लागेल, असेही शरद पवार म्हणाले.

































































