650 कोटींचे राफेल,1600 कोटींवर कसे उडाले?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
शरद पवार – 1) 18 जुलै, 1978 ते 17 फेब्रुवारी, 1980 (पुलोद), 2) 26 जून, 1988 ते 25 जून 1991 (काँग्रेस), 3) 6 मार्च, 1993 ते 14 मार्च, 1995 (काँग्रेस)

सामना ऑनलाईन, बीड

यूपीए सरकारच्या करारात 650 कोटी रुपये किंमत असलेले राफेल विमान मोदी सरकारच्या करारात 1600 कोटींवर कसे काय उडाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. राफेल खरेदीचे आपण कोणत्याही प्रकारे समर्थन केले नाही असा दावाही यावेळी पवार यांनी केला. राफेलसाठी पाकिस्तानची भीती दाखवणाऱया मोदी सरकारने चार वर्षांत अनेक जवानांचे रक्त सीमेवर सांडले तेव्हा काय केले, असा प्रश्नही पवार यांनी उपस्थित केला. राफेल खरेदीची सर्व माहिती संसदेला दिली पाहिजे असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज बीड येथे विजयी संकल्प मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेलवरून निर्माण झालेल्या वादळावर भाष्य केले. राफेल प्रकरणाचा तपास झालाच पाहिजे. राफेलविषयी कोणी बोलले तर मोदी सरकार म्हणते, गुप्तता पाळली पाहिजे. राफेलच्या तांत्रिक माहितीविषयी गुप्तता पाळायला काही हरकत नाही. मात्र राफेलच्या किमतीची माहिती मोदी का देत नाहीत असा प्रश्न पवार यांनी केला. बोफोर्स भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी करणारे भाजप राफेलच्या गैरव्यवहाराबाबत मात्र गप्प असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी ‘मन की बात’ करतात पण ‘जन की बात’ ते करत नाहीत.

जनतेचे ऐकून घ्यायला त्यांना वेळ नाही आणि ऐकूनही घ्यायचे नाही. सगळ्यांनी फक्त त्यांचेच ऐकून घ्यावे, अशी त्यांची मानसिकता आहे. मोदी धर्मा-धर्मांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. देश एकसंध ठेवण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून मनमोहन सिंगपर्यंत सर्वच पंतप्रधानांनी काम केले. मात्र मोदी नेमके याविरोधात काम करत आहेत, असाही आरोप शरद पवारांनी केला.

तत्पूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, राजेंद्र जगताप, सय्यद सलीम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर यांची भाषणे झाली. यावेळी राष्ट्रवादीचे सर्व सेलचे अध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.

राफेलसाठी मोदी सरकार फक्त पाकिस्तानची भीती दाखवत आहे. त्यांना पाकिस्तानला धडा शिकवायचा नाही. मोदींना सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय पाकिस्तानला धडा शिकवता येणार नाही. पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी कणखर माणसाची गरज आहे.