
सामना ऑनलाईन, मुंबई
प्रसिद्ध पोर्ट्रेट आर्टिस्ट भारत सिंह हे ‘शतम जीवम शरद’ या प्रदर्शनाच्या माध्यमातून कलारसिकांच्या भेटीला आले आहेत. राजकारणातील पॉवरफुल व्यक्तिमत्त्व शरद पवार यांचे विविध मूडस् दर्शविणारे सिंह यांचे पोर्ट्रेट प्रदर्शन सध्या नेहरू सेंटर येथे सुरू आहे. पवारांच्या स्वभावाचे विविध पैलू उलगडणाऱया या अनोख्या प्रदर्शनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.
शरद पवार, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नाव. राजकीय डावपेचातील त्यांच्या मूडस्चा कधीच थांगपत्ता लागत नाही असे सगळेच म्हणतात, पण पवारांचे चाहते असलेले चित्रकार भारत सिंह यांनी मात्र पवारांचे विभिन्न मूड कॅनव्हासवर चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. पवार जसे भावले, जसे दिसले, जसे समजले तसे त्यांनी कुंचल्यातून साकारले आहेत. कधी धीरगंभीर मुद्रा, तर कधी मनमोकळे चेहराभर पसरलेले हास्य, गालावर हात ठेवून विचारमंथन, तर कधी हात जोडून केलेली मिष्कीलता अशा वेगवेगळय़ा मूडस्मधील पवार या प्रदर्शनात आपल्याला भेटतात.
‘शतम जीवम शरद’ या प्रदर्शनाविषयी भारत सिंह सांगतात, शरद पवार यांचे पोर्ट्रेट प्रदर्शन भरवण्याची इच्छा अनेक दिवसांपासून मनात होती. ती आज साकार झाली आहे. एखाद्या व्यक्तीच्या राजकीय आणि सामाजिक उंचीला कलेच्या माध्यमातून केलेले हे वंदन आहे.
प्रदर्शनात भारत सिंह यांनी ऑइल ऑन कॅनव्हास प्रकारातील पवारांची 14 भव्य पोर्ट्रेट मांडली आहेत. अवघ्या सहा महिन्यांत ती तयार करण्यात आली आहेत.
सिंह हे गेल्या 15 वर्षांपासून चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. निसर्गचित्रे, अमूर्त, ऑब्जेक्टिव्ह असे अनेक प्रकार ते हाताळतात, मात्र पोर्ट्रेट पेंटर म्हणून ते जास्त लोकप्रिय आहेत. पोर्ट्रेट पेंटिंगचे त्यांचे हे आठवे प्रदर्शन आहे. याआधी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पोर्ट्रेटचे दोनवेळा प्रदर्शन भरवले होते. त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता.
- कुठे-नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडिया बिल्डिंग, वरळी.
- कधी-18 ते 24 सप्टेंबर
- वेळ-सकाळी 11 ते सायंकाळी 7



























































