
आपण कर्मचाऱयांच्या पाठीशी आहोत, पण चुकीच्या नेतृत्वाच्या पाठीशी नाही. कर्मचाऱयांना जर चुकीचा रस्ता कोण दाखवत असेल तर त्याला विरोध करण्याची जबाबदारी तुमची आमची आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रात राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात. पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्राची नाही. पण गेले काही दिवस एसटी कर्मचाऱयांना जे काही सांगण्याचा प्रयत्न केला जात होता तो अशोभनीय आहे. कारण नसतानाही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे. जे नैराश्य आले, ते कुठेतरी काढले पाहिजे, म्हणून त्यांनी या ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यात दुसरे काहीही नाही, असे शरद पवार म्हणाले.
एसटी कर्मचारी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गेली 40-50 वर्षे त्यांचे एकही अधिवेशन माझ्याकडून कधी चुकलेले नाही. ज्या ज्या वेळी प्रश्न निर्माण झाले, तेव्हा ते सोडवण्यासाठी आपल्या सगळ्या सहकाऱयांनी कष्ट घेतले. या वेळेला त्यांना एक चुकीचा रस्ता दाखवला आणि त्याचे परिणाम आज इथे दिसतायत, अशा शब्दांत शरद पवार यांनी एसटी संपाच नेतृत्व करणाऱयांबाबत नाराजी व्यक्त केली.
आज जे काही घडले, त्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही. नेता शहाणा नसला, तर कार्यकर्त्यांवर देखील त्याचा दुष्परिणाम होतो याचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले.
एसटी कर्मचाऱयांच्या आत्महत्येस संपाचे नेते जबाबदार
चुकीचा रस्ता दाखवला आणि कारण नसताना घरदार सोडून एसटी कर्मचारी नोकरीच्या बाहेर राहिला. त्यामुळे आर्थिक संकटामध्ये सापडल्याने नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या कर्मचाऱयांवर आत्महत्या करायची वेळ आली. ज्यांनी या संपाचे नेतृत्व केले तेच यासाठी जबाबदार असल्याचे शरद पवार म्हणाले.
हे कट कारस्थान
शरद पवार यांच्या घरी जाऊन असा हल्ला घडविणे म्हणजे काहीतरी कट कारस्थान आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषद उपसभापती नीलम गोऱहे यांनी दिली.काही लोक एस्टी कामगारांना दावणीला बांधण्याचे षडयंत्र करीत आहेत. त्यामुळे एका बाजूला कामगारांचे नुकसान तर होतच आहे, पण दुसरीकडे कामगार चळवळीची एक तेजस्वी आणि प्रज्वलित परंपरा आहे तिला काळिमा लागला आहे. महाराष्ट्राच्या प्रबोधनाच्या परंपरेला काळिमा लागला आहे.याच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊन प्रसंगी वेळ पडल्यास एमपीडीएसारखे कायदे लावले जावेत अशी शासनाकडून अपेक्षा आहे असे त्या म्हणाल्या.




























































