
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 1800 कोटी रुपये किमतीचा महार वतनाचा भूखंड अवघ्या 300 कोटींना खरेदी केला. केवळ 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने पदरात पाडून घेतली. हा प्रकार समोर आल्यानंतर संतापाचा आगडोंब उसळला आणि त्यानंतर हा व्यवहार सद्द करण्यात आला. मात्र कंपनीची 99 टक्के मालकी असतानाही पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत असतानाच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल करण्यात आला नाही याचे उत्तर गृहमंत्री देऊ शकतात, असे ते म्हणाले.
अकोला येथे पत्रकार परिषदे दरम्यान माध्यम प्रतिनिधींनी पार्थ पवार जमीन घोटाळ्याबाबत शरद पवार यांना प्रश्न विचारला. याला उत्तर देताना ते म्हणाले की, सरकारने एक समिती स्थापन केली आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली ते प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांना एक महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
सध्या भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार असून देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रमुख आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी हा एक गंभीर विषय असल्याचे जाहीरपणे सांगितले. मुख्यमंत्री एखादा विषय गंभीर आहे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून वास्तव त्यांनी समाजासमोर ठेवले पाहिजे. हे काम त्यांनी करावे ही अपेक्षा, असे शरद पवार म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मुंढव्यातील हा जमीन व्यवहार दुय्यम निबंधकांनी रद्द केला असून सरकारी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्याकडे मजबूत पुरावे, गोष्टी असतील. त्या आधारे हा निर्ण घेतला असेल. यावेळी त्यांना शीतल तेजवानी आणि इतर आरोपींबाबत विचारले असता त्यांनी याबाबत आपल्याला काही माहिती नाही. ज्यांनी याबाबत आरोप केले, त्यांनीच शोधून काढावे असे म्हटले.
यावेळी शरद पवारांनी प्रशासन, राजकारण आणि कुटुंब यात फरक असल्याचे म्हटले. कुटुंबात आम्ही एकमेकांविरुद्ध लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता, अजित पवारांचा मुलगा माझ्या मुलीच्या विरुद्ध उभा होता. राजकारणात कुटुंब नाही तर विचारधारा महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.





























































