
‘वय वाढलं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून मागे राहू नका. ज्येष्ठ नागरिकांचा हात मोडेल, पाय मोडेल, मात्र मेंदू शाबूत राहतो. मेंदू जोपर्यंत सशक्त आहे, तोपर्यंत ज्येष्ठांनी नव्या पिढीला मार्गदर्शन करावं. ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
बारामती येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या वय झाल्याच्या टीकेला सडेतोड उत्तर दिले. यावेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव, तालुकाध्यक्ष एस. एन. जगताप, ज्येष्ठ नेते तुकाराम जगताप, सतीश खोमणे, वनिता बनकर, सुभाष ढोले, अॅड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष माधव जोशी यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
शरद पवार यांचे बैठकीत आगमन होताच ज्येष्ठांनी त्यांच्या नावाचा गजर करून पाठिंबा दिला. शरद पवार पुढे म्हणाले, देशाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे कार्य मोठे आहे. अजूनही देशाच्या उभारण्यात तुमची मदत होऊ शकते. विशिष्ट वयात निवृत्त होऊनही अनेकजण समाजासाठी योगदान देत आहेत. आता ज्येष्ठांच्या ओळीत मी पण बसतो. माझं वय 84 वर्ष झाले आहे. ज्येष्ठांचे पूर्ण जाणून घेतले पाहिजेत. नव्या पिढीला ज्ञान देणारे घटक म्हणून तुमच्याकडे पाहिले जात आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी कुस्तीगीर संघाच्या कार्यालयात भेट देत पदाधिकाऱयांशी चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवार हे बारामतीत तळ ठोकून आहेत. विविध पदाधिकाऱयांसह ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी, यांच्याशी ते संवाद साधत आहेत.
अजित पवारांचा समाचार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार यांच्यावर ‘ज्येष्ठ’, ‘वय झालं आहे’, ‘आता घरी बसून मार्गदर्शन करावे, आम्हाला संधी द्यावी’ अशी वक्तव्ये वारंवार आपल्या भाषणातून केली. त्याचा समाचार घेताना शरद पवार यांनी थेट बारामतीमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवार यांना शरद पवार यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारले.





























































