
काही लोक म्हणतात की तुमचं वय झालंय आता निवृत्त व्हा. आम्ही यशवंतरावांच्या विचारांतून चालत आलो. त्या विचारात वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाहीत. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. येवला येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आपल्या भाषणाची सुरुवात करताना शरद पवार म्हणाले की, या ठिकाणी उपस्थित असलेल्या बंधु भगिनींनो, आज बऱ्याच काळानंतर माझं इथे येणं झालं आहे. एक काळ असा होता की नाशिक जिल्ह्यात आल्यावर माझी पहिली चक्कर इथे असायची. आमचे अनेक सहकारी होते. राजकारणात चढ उतार आला तरी त्या सहकाऱ्यांनी साथ कधी सोडली नाही. या सगळ्यांसोबत एका कालखंडात मला काम करण्याची संधी मिळाली. अलिकडे जबाबदाऱ्या वाढल्या, माझं महाराष्ट्रातलं येणं कमी झालं. देशपातळीवर काम करण्याची स्थिती आली, त्यामुळे साहजिकच इथे येणं कमी झालं. महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यांनी गेली अनेक वर्षं पुरोगामी विचारांना साथ दिली, त्या जिल्ह्यांचा उल्लेख करायचा असेल, तर एक नंबरवरच्या जिल्ह्याचं नाव नाशिक आहे. या नाशिकमधला माणूस कष्टकरी शेतकरी असेल, दुष्काळी भागातला आमचा सहकारी असेल या सगळ्यांच्यावर संकटं आली तरी त्यांनी कधी साथ सोडली नाही. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की दिल्ली मुंबईमध्ये काही लोकांना आम्ही जनतेसमोर सादर केल्यानंतर यश मिळवता आलं नाही आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांना आणायचं असेल तर भक्कम विश्वासाच्या मतदारसंघाची आवश्यकता आहे. म्हणून आम्ही या येवल्याची निवड केली, असं शरद पवार यावेळी म्हणाले.
येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना शरद पवार यांनी नाव न घेता सूचक टोला हाणला. ते म्हणाले की, मघाशी काही वक्त्यांनी सांगितलं, की पवारांनी नाव दिलं, त्यांना आम्ही निवडून दिलं. एकदा, दोनदा, तीनदा निवडून दिलं. नाव कधी चुकलं नाही, पण एका नावात घोटाळा झाला. त्याच ठिकाणी लोकांचा अनुभव वेगळा आला. आज मी इथे कुणाचं कौतुक करण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी आलेलो नाही. आज मी इथे माफी मागायला आलो. मी माफी यासाठी मागतोय की माझा अंदाज कधी फारसा चुकत नाही, पण इथे माझा अंदाज चुकला. माझा अंदाज चुकला, माझ्या विचारावर तुम्ही निकाल घेतले आणि त्यामुळे तुम्हालाही यातना झाल्या. त्या माझ्या निर्णयामुळे झाल्या असतील तर माझं कर्तव्य आहे की तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. पण, माफी मागत असताना दुसरी गोष्ट की कधीकाळी लोकांच्या समजण्याची वेळ येईल, तेव्हा मी पुन्हा इथे येईन आणि पुन्हा इथे येऊन चूक करणार नाही. योग्य निकाल सांगेन. येवला मतदारसंघातील जनतेची साथ मिळवल्याशिवाय राहणार नाही, असंही ते यावेळी म्हणाले.
शरद पवार यांनी वयावरून बोलणाऱ्या अजित पवार यांचं नाव न घेता वयाचा उल्लेख करण्याची गरज नसल्याचंही यावेळी म्हटलं. ‘काही लोक म्हणाले की, तुमचं वय झालं, तुम्ही आता निवृत्त व्हा. वय झालं हे खरंय, वय 82 झालंय. पण गडी काय आहे तू पाहिलाय कुठे? अजून तो फर्स्ट क्लास आहे. जास्त सांगायची गरज नाही. यशवंतरावांच्या विचारातून चालत आलो कायम. त्या विचारात वय आणि व्यक्तिगत हल्ला या गोष्टी आम्हाला शिकवल्या नाहीत. वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल, असा हल्लाबोलही शरद पवार यांनी यावेळी केला.


























































