
परदेशातील साखरेच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. ही तफावत लक्षात घेऊन केंद्रातील भाजप सरकारने साखर निर्यातीला परवानगी द्यायला हवी होती. मात्र, शेतकऱयांच्या हिताची जाण नसलेल्या सरकारने साखर निर्यातीला बंदी घातली. साखरेप्रमाणेच कांदा निर्यातीला बंदी घालून कांदा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभापासून सरकारने वंचित ठेवले. शेतकऱयांच्या हिताचे निर्णय न घेता त्यांना उद्ध्वस्त करण्याचे धोरण राबविणाऱ्या या सरकारला आगामी निवडणुकीत खड्यासारखे बाजूला करा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार रोहित पवार, आमदार बबनराव शिंदे, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय पाटील, आमदार कैलास पाटील, आमदार रवींद्र धंगेकर, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, चेअरमन अभिजित पाटील, डॉ. बी. पी. रोंगे आदीसह संचालक मंडळ उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ब्राझीलसारख्या देशात साखरेचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे जगाला साखर निर्यात करण्याची संधी आपल्याकडे आहे. मात्र, केंद्र सरकारकडून जिथे जास्त दर तिथे विकायचे नाही, असे धोरण राबवले जात आहे. हे शेतकरीविरोधी आहे. त्यामुळेच देशभरात भाजपविरोधात वातावरण तयार होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात जाऊन कर्नाटकात प्रचार करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीला महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे. कर्नाटकातदेखील काँग्रेसची सत्ता येणार असल्याचे चित्र दिसून येते. देशातील 5 ते 6 राज्यांमध्येच भाजपची सत्ता आहे. पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू आदींसह विविध महत्त्वाच्या राज्यात भाजपची सत्ता नाही. भाजपविरोधात जनतेचा रोष वाढत आहे. त्यामुळे भाजपविरोधकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे शरद पवार म्हणाले.
सरकारच्या प्रकल्पाचे स्वागत व्हावे; मात्र स्थानिकांना विचारात घेऊन असे प्रकल्प व्हावेत. लोकांना विश्वासात घेतले नसल्यामुळे बारसूच्या प्रकल्पाला राष्ट्रवादीचा विरोध आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात रोष आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा असल्याचे दिसत असल्याचेही शरद पवार म्हणाले.
राज ठाकरेंना मिमिक्रीशिवाय काय जमतं – रोहित पवार
राज ठाकरे यांची बॉडी लँग्वेज आता पूर्वीची राहिली नाही. सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायची स्टाईलही राहिली नाही. राज ठाकरे यांचे कालच्या सभेतील अर्धे भाषण इतर पक्षांच्या प्रभावाखाली होते की काय, अशी शंका येण्यासारखे होते. त्यांना मिमिक्रीशिवाय काय जमते. तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क आहे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला.
अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत मातब्बरांना मात देत अभिजित पाटील प्रकाशझोतात आले होते. राज्यातील पाच कारखाने ते चालवत आहेत.

























































