
समृद्धी महामार्गावर सतत अपघात होत आहेत. हे मागील काही महिन्यांत सातत्याने पाहायला मिळत आहे. जो अपघातात मृत्युपावतो तो ‘देवेंद्रवासी’ होतो, असं लोक म्हणत असल्याचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. हा महामार्ग बांधताना निर्णय घेण्यात, त्याचं नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्यांना स्थानिक लोक कळत न कळत दोषी ठरवत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर खासगी बसच्या अपघातामध्ये 26 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर सतत अपघात होत आहेत. महामार्ग पाहण्यासाठी मी मार्ग बदलून त्या रस्त्याने प्रवास केला. त्यावेळी एका ठिकाणी गर्दी होती म्हणून गाडी थांबवली आणि लोकांना अनुभव विचारला. तेव्हा लोकांनी सांगितले की, या रस्त्याची राज्यभर चर्चा झाली, उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने अपघात बघायला मिळत आहेत आणि कदाचित या रस्त्याचे वैज्ञानिकरीत्या नियोजन केलेलं नसावं आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून लोक मृत्युमुखी पडत आहेत, असे लोकांनी सांगितल्याचे शरद पवार म्हणाले. या महामार्गावर झालेल्या अपघातामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर ती व्यक्ती ‘देवेंद्रवासी’ झाल्याची चर्चा होते, असा टोला पवार यांनी लगावला.
समृद्धीसाठी तज्ज्ञांची टीम नेमा
झालेला अपघात दु:खद आहे. 25-25 माणसे जातात. हे सतत होतंय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारने पाच लाख रुपये मदत दिली. पाच लाख रुपये देऊन हे प्रश्न सुटणार नाहीत. आतापर्यंत झालं ते वाईट झालं. देशात रस्ते आणि त्याचं नियोजन करण्याचं ज्ञान असलेल्या लोकांची टीम तयार करावी. संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करून झालेली चुक शोधून काढावी आणि अपघात थांबवायला हातभार लावावा, असे शरद पवार म्हणाले.

























































