
अजित पवार हे सपशेल खोटं बोलताहेत, असे ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दादांच्या नौटंकीचा बुरखा टराटरा फाडला आहे. पवार यांनी अजितदादांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला असून अजित पवार हे दिशाभूल करत असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
भाजप आणि राष्ट्रवादी मिळून महाराष्ट्रात स्थिर सरकार देतील, असे ट्विट अजित पवारांनी केले. त्यानंतर लगेचच शरद पवार यांनी ट्विटरवर सणसणीत उत्तर दिले आहे. पवार म्हणतात, भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना आणि काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस असे तिघे मिळून सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे.
अजित पवार यांचे म्हणणे तद्दन खोटे असून ते दिशाभूल करत आहेत, संभ्रम निर्माण करत आहेत. जनतेमध्ये चुकीचा समज निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. अजित पवार यांची ट्विटर खेळी राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी असल्याची चर्चा आहे.




























































