मोदी हैंतो… नामुमकीन करून दाखवू! शरद पवार यांचा भाजपला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची खात्री नसल्यानेच भाजपमध्ये अस्वस्थता आहे. निवडणूकपूर्व महाराष्ट्रात झालेल्या सर्व्हेत भाजपला 50 टक्केही जागा मिळणार नाहीत, असे सर्व्हेमध्येच म्हटले आहे. त्यामुळेच काही राज्यांत ‘ईडी’, ‘सीबीआय’ यासारख्या यंत्रणांचा वापर करून इतर पक्ष फोडणे हाच भाजपचा धोरणात्मक कार्यक्रम झाला आहे. त्यामुळे आता ‘मोदी है तो मुमकीन है नव्हे, तर नामुमकीन है’, हे आम्ही दाखवून देऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.

शरद पवार म्हणाले, ‘‘चंदिगडमध्ये ‘आप’ आणि ‘काँग्रेस’ पक्षाने महापौर पदाची एकत्र निवडणूक लढवली. या वेळी निवडणूक अधिकाऱयाने मतपत्रिकेवर फुली मारून ‘आप’ची आठ मते बाद केली. ही बेकायदेशीर कृती होती. न्यायालयाने यावर ताशेरे मारल्यानंतर तेथे ‘आप’चा महापौर झाला. मात्र सत्ताधारी सत्तेचा गैरवापर कसा करतात, याचे उत्तम उदाहरण या निवडणुकीतून दिसले. विरोधकांना बाजूला करण्यासाठी आताचे राज्यकर्ते कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सिद्ध होत आहे. राष्ट्रवादी काँगेसबाबतचा निकालही असाच एकतर्फी लावण्यात आला. पक्षाची स्थापना आपण केली. तरीही पक्ष आणि चिन्हही दुसऱयांना दिले. निवडणूक आयोगाला सात दिवसांत नवीन चिन्ह देण्याचे आदेश देण्यात आले. न्यायालयानेही निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे न्यायव्यवस्थेमुळे किमान काही प्रश्न सोडवता येतात, ही आशा आहे. निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर आम्ही सर्वपक्षीय मिळून पक्षांतर आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर नव्याने आवाज उठवणार आहोत,’’ असेही शरद पवार म्हणाले.

…तर 1980ची पुनरावृत्ती होईल

सन 1980मध्ये माझ्या पक्षाचे 69 आमदार निवडून आले. बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते. दहा दिवस परदेश दौऱयावर जाऊन आलो, तेव्हा सहा सोडून बाकीचे सर्व आमदार सोडून गेले होते. त्यानंतर पाच वर्षांनी झालेल्या निवडणुकीत सोडून गेलेल्यांपैकी 95 टक्के आमदार पराभूत झाले. याचीच पुनरावृत्ती आताही होईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

अमित शहांचे ते अज्ञान

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न असून घराणेशाही करीत असल्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, माझी कन्या तीन वेळा लोकसभेला निवडून आली. आताही ती लोकसभा लढवणार आहे. याची माहिती अमित शहा यांना नसावी. त्यामुळेच सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पदासाठी प्रयत्न करीत असल्याचे ते म्हणत असावेत. ते त्यांचे अज्ञान असावे, असा टोला पवार यांनी लगावला. भाजपने एकाच घरात दोनहून अधिक पदे दिलेल्यांची नावेही जाहीर करावीत, असे आव्हानही त्यांनी दिले.

पवार कुटुंबातील कोणी राजकारणात आले तर स्वागतच

युगेंद्र पवार हे राजकारणात आहेत, हे आपल्याला माहीत नाही. ते व्यावसायिक असल्याचे माहीत असल्याचे सांगत, पवार कुटुंबातील अजून कोणी राजकारणात आले तर स्वागतच आहे. विरोधी पक्षाने अद्याप उमेदवारांची नावे जाहीर केली नसल्याने सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उभे राहणार असल्याची आपल्याला कल्पना नाही, असेही शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

साहेब म्हणतील तसंच!

‘मी राजकारणात नाही; परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले तर मी जरूर काम करेन. साहेब म्हणतील तसेच होईल,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी आज सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती येथील कार्यालयाला त्यांनी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांनी मला कुटुंबात एकटे पाडले जात असल्याचे सांगितले होते. यावर बोलताना युगेंद्र पवार म्हणाले, ‘मला तसे वाटत नाही. कुटुंब वेगळे व राजकारण वेगळे आहे. पण त्यांना एकटे पाडले, अशी स्थिती नाही.’ बारामतीत पवार विरुद्ध पवार निवडणूक लढली जाणार असून, त्यात तुम्ही कोणाचे काम करणार? अशी विचारणा केली असता, ते म्हणाले, ‘अजून निवडणुकीला महिना-दीड महिन्याचा अवकाश आहे. यथावकाश सगळ्या बाबी स्पष्ट होतील. अगोदर उमेदवार तर ठरू द्या!’

‘मी बारामतीत विद्या प्रतिष्ठानवर काम करतो. कुस्तीगीर संघाचा अध्यक्ष आहे. ‘शरयू अॅग्रो’च्या माध्यमातून कार्यरत आहे. खरे तर मी राजकारणात नाही; पण पक्षाच्या नवीन कार्यालयाला भेट द्या, अशी विनंती काहींनी केल्याने आलो . त्याचा एवढा इश्यू होईल, असे मला वाटले नव्हते.