
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातच झालेला हा पराभव म्हणजे पक्षात गेले काही दिवस सुरू असलेली धुसफूस चव्हाटय़ावर आणणारा आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी याची गंभीर दखल घेतली असून शिंदे यांनी ही निवडणूक गांभीर्याने घ्यायला हवी होती, असे म्हणत स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील निकाल व त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर झालेला हल्ला याबाबत बोलताना शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव का झाला याच्या खोलात मी गेलो नाही, मात्र ही निवडणूक त्यांनी गांभीर्याने घेणे अपेक्षित असल्याचे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ जिल्हा बँक निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला. शिंदे यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतीलच ज्ञानदेव रांजणे हे जेमतेम ताकद असलेले उमेदवार उभे होते. मात्र त्यांना जिह्यातील आणि राज्य पातळीवरील नेत्यांचा छुपा पाठिंबा असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी साताऱयामधील सर्किट हाऊसवर जिह्यातील प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, या बैठकीनंतर शशिकांत शिंदे यांनी मला जे बोलायचे ते मी 25 तारखेला पत्रकार परिषदेमध्ये बोलणार आहे. मी जेव्हा बोलेन तेव्हा माझ्या पुढील राजकीय वाटचालीची कारकीर्दसुद्धा स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. त्यावर पत्रकारांनी राष्ट्रवादीत राहूनच का? असा प्रश्न केला असता मी राष्ट्रवादीचा आणि पवारांचा सच्चा पाईक आहे. जिह्यात राष्ट्रवादी वाढण्याची जबाबदारी आता माझी असेल, असे शिंदे म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एका मताने पराभव झाल्यानंतर शिंदे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सातारा नगरपलिकेत आता मी लक्ष घालणार असल्याचे ते म्हणाले.




























































