सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, काँग्रेस आघाडीची आज दिल्लीत बैठक

822

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सोडविण्यासाठी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली. बुधवारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सायंकाळी 5 वाजता दिल्लीत बैठक होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील राजकीय स्थितीबाबत चर्चा केली. कोणत्याही एकाच पक्षाकडे बहुमत नसल्याने सत्तास्थापनेवरून निर्माण झालेला पेच सुटावा यासाठी शिवसेनेसोबत मिळून सरकार स्थापन करण्याबाबत मुंबईत यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांत दिल्लीत बैठकांची सत्रे सुरू आहेत. बुधवारी होणार्‍या दोन्ही पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमाच्या मसुद्यावर प्रामुख्याने चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते अहमद पटेल, ए. के. अँटोनी, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे आदी नेत्यांनी मंगळवारी सोनिया गांधी यांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यातील काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून सरकार बनवावे या मताचे आहेत. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्षांनी लककरात लवकर घ्याका. सत्तास्थापनेला उशीर झाल्यास नुकसान होण्याची भीती या नेत्यांनी यावेळी व्यक्त केली.

तिन्ही पक्षांना एकत्र येणे गरजेचे – मलिक

राज्यात सध्या सुरु असलेली राष्ट्रपती राजवट संपुष्टात आणण्यावर सर्वांच एकमत आहे. जर राष्ट्रपती राजवट हटवायची असेल तर तिन्ही पक्षांना एकत्र येऊन सत्तास्थापन करणे गरजेचे आहे.  त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमची चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेचा सन्मान ठेवणे ही आमची जबाबदारी आहे. त्याचसोबत  मुख्यमंत्रिपदावरून आमच्यात भांडणं होणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे – थोरात

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच सोडविण्यासाठी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात बैठक सुरु आहेत. ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील तो राज्याच्या हिताचा असेल. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे पण कशापद्धतीने यावर चर्चा सुरु असून निर्णय दिल्लीतच होईल. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा झाल्यानंतर पुढील टप्पा सुरु होईल, असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या