Pulwama Attack पुलवामा हल्ल्याआधी कितपत खबरदारी घेतली याबाबत शंका- शरद पवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sharad-pawar

सामना ऑनलाईन । पुणे

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. गुप्तचर यंत्रणांनी माहिती दिल्यानंतर देखील असा हल्ला झाला तर Pulwama Attack आधी कितपत खबरदारी घेतली अशी शंका उपस्थित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शरद पवार यांनी निषेध केला. तसेच संपूर्ण देश शहीद जवानांच्या परिवारासोबत आहे, असे विश्वासही त्यांनी दिला. ही वेळ राजकारण करण्याची नाही, असे म्हणतानाच त्यांनी सरकारने खबरदारी घेतली की नाही अशी शंका मात्र उपस्थित केली. जम्मू हा तसा सुरक्षित भाग आहे. त्याभागात असे हल्ले रोखण्याची, त्याला तोंड देण्याची क्षमता असलेली शस्त्रे आणि यंत्रणा आहे. जवानांचा एवढा मोठा ताफा जेव्हा या मार्गावरून नेला जातो त्याआधी सुरक्षेची सर्व पाहणी केली जाते. हे काम अत्यंत शांततेने कुणालाही कसलीही खबर लागू न देता केले जाते. मात्र असे असताना देखील झालेला हल्ला पाहता ही वाहनं या मार्गाने जाणार असल्याची माहिती दहशतवाद्याना मिळाली होती असं दिसतं आहे. आधी स्फोटकांनी भरलेल्या गाडीने धडक देऊन बस उद्ध्वस्त करण्यात आली आणि त्यानंतर गोळीबार देखील झाला. याचाच अर्थ पूर्व तयारी करून हा हल्ला केला आहे. त्यामुळेच खबरदारी कितपत घेतली त्याची शंका उपस्थित होत असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.