
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱया एकाला मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट 2 ने पुण्याहून अटक केली. सागर बर्वे असे त्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या आठवडय़ात शरद पवार यांना सोशल मीडियावरून जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. एका ट्विटर हॅन्डलवरून आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून धमकी दिली.
तुझा लवकरच दाभोलकर होणार अशा प्रकारची धमकी देण्यात आली होती. तर एका ट्विटर हॅन्डलवरून आक्षेपार्ह भाषा असलेला मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले.
धमकीप्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास क्राइम ब्रँच युनिट 2 कडे सोपवण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी धमकीचे ते मेसेज कुठून आले याचे तांत्रिक विश्लेषण केले. त्या आधारे पोलिसांचे पथक पुणे येथे पोहचले. पुणे येथून पोलिसांनी सागर बर्वेला ताब्यात घेऊन अटक केली. त्याने तो धमकीचा मेसेज पाठवल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सागरकडून एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे. तो तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवला जाणार आहे. सागर हा तपासात सहकार्य करत नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्याच्या चौकशीनंतर आणखी काही बाबीचा उलगडा होणार आहे.


























































