ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातात देशाची सूत्र, शरद पवारांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत अजित पवारांचा गट बाहेर पडल्यानंतर राज्यासह देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत आज राष्ट्रवादीच्या दोन बैठका होत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली, तर एमईटी वांद्रे येथे अजित पवार यांनीही अशीच बैठक आयोजित केली. या बैठकांसाठी दोन्ही बाजूंनी जोर लावण्यात आला.

या भाषणात शरद पवारांची आक्रमकता पाहायला मिळाली. त्यांनी सत्ताधारी भाजपचं खरं रुप समोर मांडत, देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. तसंच या परिस्थितीत देखील आपण खंबीरपणे उभं राहणार असून राज्याच्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनात देखील प्रकाश आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मापासूनचा इतिहास, संघर्ष त्यांनी उपस्थितांपुढे मांडला. जे भाजपसोबत गेले ते पुढे संपतात, पण ज्यांना जायचं त्यांना सुखानं जाऊ द्या, आपल्या सामूहिक शक्तीतून महान कर्तुत्त्वान पिढी निर्माण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलं.

‘आजची बैठक ही ऐतिहासिक बैठक आहे. या बैठकीकडे साऱ्या देशाचं लक्षं लागलं आहे. सबंध देशात चर्चा आहे. 24 वर्षांपूर्वी याच मुंबईत तुमच्या उपस्थित राष्ट्रवादीचा जन्म झाला. षणमुखानंदमध्ये बैठक झाली आणि संध्याकाळी शिवाजीपार्कवर लाखोंची सभा झाली. पक्षाची स्थापना केली. आज 24 वर्ष झाली, या वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्त्वाची फळी उभी करण्यात आपल्याला यश आलं. कुणी मंत्री झालं, आमदार, खासदार झालं. अनेकांना मंत्रिमंडळात काम करायला संधी मिळाली आणि राज्य शकट चालू शकतो हे राष्ट्रवादीनं दाखवून दिलं. अनेक नवीन नेते राष्ट्रवादीने तयार केले. मनामध्ये एकच बाब होती, या महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा. या महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसाच्या जीवनात प्रकाश कसा येईल याची काळजी घ्यायची. त्या कामात तुमच्या कष्टामुळे यशस्वी झालो. आज आपल्याला पुढे जायचं आहे. संकटं खूप आहेत. ती संकटं ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातात देशाची सूत्र आहेत. ज्यांच्या हातात देशाची सूत्र आहेत त्यांच्या पुढं त्यांच्या सहकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या मनात असलेल्या कल्पना मांडण्यास मर्यादा आहेत, अशा शब्दात शरद पवार यांनी देशातील सत्ताधारी भाजपमधील परिस्थिती मांडत त्यांच्या बुरखा फाडला.

”सामान्य माणसाची प्रतिक्रीया काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर लोकांशी संवाद साधावा लागतो. लोकांशी बोलावं लागतं. लोकांचं म्हणनं ऐकून घ्यावं लागतं. आज देशात संवाद नाही. आम्ही सर्व सत्ताधारी पक्षात नाही., त्यामुळे कधी काळी जी सामान्य माणसाची दुखाची स्थिती समजते. त्यातनं मार्ग काढण्याची इच्छा असते. पण संवादच नसेल तर या सगळ्यात मर्यादा येतात. आज देशातल्या सगळ्या जनतेत एक प्रकारची अस्वस्था आहे. एका बाजुला हे चित्र आहे दुसऱ्या बाजुला आम्ही लोकांनी प्रयत्न केले. लोकशाही टिकवायची असेल तर संवाद साधायला हवा. हा पहिला संवाद आम्ही जे सत्ताधारी पक्षात नाही त्या सगळ्यांना एकत्र आणायला प्रयत्न केले. पाटण्यात आम्ही भेटलो. 17-18 तारखेला आम्ही बंगळुरूला एकत्र येणार आहोत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली, असे शरद पवार म्हणाले

”पंतप्रधानंनी भोपाळला एक भाषण केलं. त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादीने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. हे सगळं सांगत असताना त्यांनी पाटबंधारे खात्याचा उल्लेख केला. प्रधानमंत्र्यांचं एक वैशिष्ट आहे. त्यांनी एका सभेत सांगितलं की देश कसा चालवायचा, प्रशासन कसं चालवायचा हे मी पवार साहेबांकडून शिकलो. त्याच्यानंतर निवडणूकीच्या काळात आले प्रचंड शिवीगाळ केली. या देशाचं नेतृत्व करतात त्यांना काळजी करावी लागते.नुसते आरोप करून चालणार नाही. खरंच स्तुतीचं काम केलं पाहिजे तेही स्वीकारलं पाहिजे. सत्य सांगितलं पाहिजे. तेवढी धमक दाखवली नाही. आपण देशाचे नेते आहोत. राजकीय पक्षाचे फक्त नेते नाहीत. पण ज्यावेळेस देशाच्या नेता म्हणून जनमाणसा समोर बोलतो तर तशी मर्यादा आपण पाळली पाहिजे. पण त्या मर्यादा पाळला जात नाही. जर राष्ट्रवादी पक्ष एवढा भ्रष्ट आहे असं जर तुम्हाला वाटतं तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना तुमच्यासोबत का घेतलं? तुमच्या मंत्रीमंडळात कसं सामिल केलं. याचा अर्थ असा आहे की हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात. जनमानसात वेगळं वातावरण निर्माण करणयाचा प्रयत्न करतात”, असं सांगत शरद पवार यांनी भाजपवर निशाणा साधला.

”आज विधीमंडळाचे सभासद, ,सत्ताधारी पक्षाचे आमदार खासदार खासगीत सांगतात की असं असं घडतंय. मी विचारलं त्यावर चर्चा का करत नाही तर बोलतात ते शक्य नाही. राजीव गांधीच्या काळात बघितलं, नरसिंह रावांचा काळ बघितला, मनमोहन सिंहाचा काळ बघितला दर मंगळवारी खासदारांची बैठक व्हायची. त्यानंतर खासदार आपल्या मतदारसंघाची माहिती द्यायचे, प्रश्न मांडायचे. पण आज देश आपल्या मुठीत ठेवून चालले आहेत, आमदारांना दमदाटी, कामात अडथळे आणले जात आहेत”, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली.

”काही लोकांनी बाजुला जायचं ठरवलं मला राग नाही पण दुख आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यांना विधीमंडळात आणण्यासाठी घाम गाळला. ज्या कार्यकर्त्यांनी हे चांगले दिवस आणले त्यांनी विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता ज्यांचे विचार आपल्याला मान्य नाही ज्यांच्या विरोधात आपण भूमिका घेतली, त्यांच्या सोबत जायचं हे योग्य नाही. त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. काल नाशिकला पक्षाच्या कार्यालायत गडबड केली गेली. काही लोकांनी पक्ष कार्यालयाचा ताबा घेतला. तुम्ही पक्षात आहात का? हे कसं झालंय की कुणीही उठलं मी भाजप आहे मी राष्ट्रवादी मी शिवसेना आहे हे सांगितलं तर… याला काय अर्थ आहे? त्यावेळी अशी भूमीका मांडून ताबा घेणं हे योग्य आहे का? पण ती झाली. मी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा टिळक भवन आमच्याकडे होतो. जेव्हा आम्ही नवीन पक्ष काढायचा ठरवलं टिळक भवन आम्ही सोडून दिलं. कारण ती काँग्रेसची प्रॉपर्टी होती. आम्हाला ते हिसकावून घ्यायची गरज नव्हती. ते आमच्या हातात होतं. काल जे नाशिकला झालं पक्षाची प्रॉपर्टी पोलिसांना हाताला घेऊन ताबा घेता. ही घडाळ्याची खून आमची आहे. ती निवडणूक आयोगाने कुणाला दिली हे साऱ्या देशाला माहित आहे. तुमच्या साठी सांगतो कोण कुठे जाणार नाही. पण खून राजकारण ठरवत नाही. मी अनेक निवडणूका लढलो. 1967 साली पहिली निवडणूक तेव्हा माझी खून बैलजोडी होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन गट झाले. त्यात आमची खून गेली. त्यानंतर आमची खून झाली गायवासरू. त्याच्यानंतर चरखा होता. चरख्यानंतर आला पंजा आणि त्यानंतर घड्याळ आलं. चिन्ह कुठे जाणार नाही. पण जर कुणी सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. जोपर्यंत सामान्य माणासाच्या अंतकरणामध्ये त्या पक्षाचा विचार व कार्यकर्त्यांची भूमिका सखोल आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही” असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

”मी काही लोकांवर भाष्य करू शकत नाही. एक बोलताना ते सतत सांगत होते की ते आमचे गुरू आहेत. आमच्या मित्रांचा जो मेळावा झाला त्यांच्या मागे जो फोटो होता तो होता माझा. होर्डिंग्जवर फोटो माझा. कारण त्यांना माहित आहे की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल तेच घेतलं पाहिजे. त्यांचं नाणं खरं नाहीए. ते खण करून वाजत नाहीए. त्यामुळे ते माझाच फोटो वापरत आहेत”, असा टोला शरद पवार यांनी बंडखोर गटाला लगावला.

”काही लोकांनी भाषणं केलं. पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरलाच जावं लागतं असं नाही आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारीला जातात. अंतकरणात एकच भाव असते की पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. पंढरीला पोहोचल्यावर मंदिरात देखील जाता येत नाही बाहेरुनच दर्शन घेतात व परत जातात. पांडुरंग म्हणायचं. गुरू म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं म्हणायचं. मला आठवतंय असेच एक गृहस्थ तुरुंगात गेले. राहिले तिथे काही दिवस. जे काय प्रयत्न करायचे होते ते प्रयत्न झाले. सुटून आले. निवडणूका आल्या. मला काही लोकांनी सांगितलं की तुरुंगात राहिलेल्यांना त्यांना संधी देऊ नका. ते मी ऐकलं नाही. त्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं म्हणून माझा पक्ष त्यांच्या मागे उभा राहिला. शिवाजी पार्कात मंत्रीपदासाठी नावं द्यायची होती तेव्हा पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका मी घेतली. आज मला आठवतंय की सकाळी मला फोन आला. मी विचारलं की काय चाललंय. तेव्हा मला बोलले की मी जातो बघतो काय चाललं आहे आणि कळवतो हे मला सांगितलं. आणि दोन तीन वाजता मी बघितलं की त्यांनी शपथच घेतली. त्यामुळे आता बघून येतो असं कुणी सांगितलं तर जरा जपून”, असा टोला शरद पवार यांनी नाव न घेता छगन भुजबळ यांना लगावला