शेअर बाजारात घसरण; बीएसईचा निर्देशांक 300 अंकांनी खाली, निफ्टीचीही घसरगुंडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराची सुरुवात मंदीने झाली आहे. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक बीएसई 231.55 अंकांनी खाली आल्याने 37375.34 अंकांवर बाजाराची सुरुवात झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 63.20 अंकानी घसरल्याने निफ्टीची सुरूवात 11010.25 अंकावर झाली. बाजाराची सुरुवात मंदीत झाली तसेच बाजारात उत्साह नसल्याने नंतरही बाजारात घसरण सुरूच होती. सुरुवातीच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 400 अंकापर्यंत घसरला होता. बीएसई 37,303.15 वर होता. तर निफ्टीचीही घसरगुंडी होत निफ्टी 11 हजारच्या स्तराखाली आला होता. निफ्टी 10996.30 अंकांवर होता.

शुक्रवारी बाजार घसरून बंद झाला होता. सोमवारी बाजाराची सुरुवात झाल्यावरही घसरण सुरुच होती. जागतिक बाजारातून मंदीचे संकेत मिळत असल्याने त्याचा परिणाम बीएसई आणि निफ्टीवरही झाला. तसेच कोरोना संकट, सोने-चांदीत वाढत असलेली गुंतवणूक आणि शुक्रवारी सुरू झालेले विक्रीच सत्र यामुळे बाजारात घसरण दिसत आहे. शेअर बाजारातील रिलायन्स, एचडीएफसी बँक यासह प्रमुख शेअरमध्ये घसरण झाल्याने शेअर बाजाराचा निर्देशांकही घसरला. मुंबई शेअर बाजारात सुरुवातीलाच 300 अंकांची घसरण नोंदवण्यात आली. तर निफ्टी 77 अंकांनी घसरून 11 हजारच्या स्तराखाली आला आहे. बँकिग क्षेत्राच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यात इंडसइंड बँक,एचडीएफसी, अॅक्सीस या बँका आहेत. तसेच ओएनजीसी, पॉवर ग्रीड, सन फार्मा, रिलायन्स या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. तर पहिल्या सत्राच्या शेवटच्या टप्प्यात बजाज अॅटो,टायटन, मारुती सुझुकी, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा आणि स्टेट बँकेच्या शेअरमध्ये काही प्रमाणात तेजी आली.