
गेल्या काही महिन्यांत ‘आयपीओ’बाबत गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढताना दिसत आहे. आता याच मालिकेमध्ये पेटीएमचा आयपीओ सोमवारी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ असेल. यातून कंपनीला सुमारे 18,300 कोटी रुपये उभारण्याची अपेक्षा आहे.
पेटीएमचा आयपीओ आज सकाळी 10 वाजेपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. पहिल्या तीन तासातच या आयपीओच्या 50% टक्के शेअर्सची विक्री झाली आहे. म्हणजेच या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
किमान 6 शेअर्ससाठी अर्ज करणे आवश्यक
कंपनीने या आयपीओसाठी 2,080 रुपये ते 2,150 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठेवली असून 6 शेअर्सचा एक लॉट ठेवण्यात आला आहे. किंमत आणि लॉट साइजनुसार किरकोळ गुंतवणूकदाराला किमान 6 शेअर्ससाठी अर्ज करावा लागेल. अप्पर प्राइस बँडनुसार, गुंतवणूकदारांना किमान 12,900 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
किरकोळ गुंतवणूकदार या आयपीओमध्ये जास्तीत जास्त 15 लॉटसाठी अर्ज करू शकतात, ज्यासाठी त्यांना 193,500 रुपये द्यावे लागतील. नियमांनुसार किरकोळ गुंतवणुकीसाठी किमान एका लॉटसाठी अर्ज करावा लागतो. तुम्ही पेटीएम आयपीओमध्ये 15 हुन अधिक अर्ज केल्यास तुम्हाला यासाठी 12,900 रुपये गुंतवावे लागतील. पेटीएमने आपल्या आयपीओचा आकार 18,300 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही रक्कम 16,600 कोटी रुपये इतकी होती.
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा याबाबत बोलताना म्हणाले आहेत की, आयपीओची किंमत कमी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून अधिकाधिक लोकांना ते खरेदी करता येतील. पेटीएमला FY19 मध्ये 4,212 कोटी रुपये, FY20 मध्ये Rs 2,468 कोटी, FY21 मध्ये Rs 1655 कोटी आणि चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत 381 कोटींचा तोटा झाला होता.
दरम्यान, आयपीओ ही सामान्य गुंतवणूकदारांसाठी कंपनीत गुंतवणूक करून पैसे कमविण्याची मोठी संधी असते. या वर्षीच्या आयपीओबद्दल बोलायचे तर, सुमारे 60 टक्के आयपीओचा गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे.

































































