‘शॉटगन’ काँग्रेसच्या हातात! शत्रुघ्न सिन्हा गुरुवारी काँग्रेसमध्ये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

भाजपचे बंडखोर नेते तसेच प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे 28 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बिहार काँग्रेस अभियान समितीचे अध्यक्ष खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी ही माहिती दिली.

भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा हे पाटणासाहिब मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले आहेत. भाजपमध्ये राहूनही त्यांनी कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरकारच्या धोरणांवर टीका केली. बंडखोरीची शिक्षा म्हणून या वेळी शत्रुघ्न सिन्हा यांचे तिकीट कापण्यात आले. पाटणासाहिब येथून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे संतापलेले शत्रुघ्न सिन्हा हे काँग्रेसचा हात हातात घेणार असल्याची चर्चा होती. काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना यावर शिक्कामोर्तब केले.

शत्रुघ्न सिन्हा हे 28 मार्च रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सिंह म्हणाले. रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा हे दोघेही कायस्थ असून पाटणासाहिब मतदारसंघात या वर्गाचे प्राबल्य आहे. काही दिवसांपूर्वीच शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विट करून ‘आता काँग्रेसयुक्त हिंदुस्थानची वेळ आली आहे,’ म्हणत संघर्षाचा एल्गार केला होता.