
ज्ञान, भक्ती आणि कर्माच्या त्रिवेणी संगमातून निःस्वार्थ सेवेचा नवा अध्याय रचणारे श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचे आज बुधवारी निधन झाले, ते 82 वर्षांचे होते. भाऊसाहेबांच्या निधनाचे वृत्त येताच विदर्भपंढरीवर शोककळा पसरली. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आपल्या निष्काम सेवेने श्री संत गजानन महाराज संस्थानला देशात प्रतिष्ठा मिळवून देणारे शिवशंकरभाऊ पाटील काही दिवसांपासून आजारी होते. चार दिवसांपासून त्यांच्या विविध अवयवांनी काम करणे थांबविले होते. प्रकृती अत्यवस्थ असली तरी भाऊसाहेबांनी कोणत्याही रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. डॉ. हरीश सराफ हे घरीच त्यांच्यावर उपचार करत होते. मंगळवारी भाऊसाहेबांचा रक्तदाब कमी झाला. वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. आज सायंकाळी 5.31 वाजता भाऊसाहेबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. भाऊसाहेबांच्या निधनाचे वृत्त येताच शेगावातील व्यापाऱयांनी प्रतिष्ठाने बंद करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. राजकीय नेते, प्रशासनातील अधिकारी, प्रतिष्ठतांनी भाऊंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. सायंकाळी 6.30 वाजता शासकीय नियमाप्रमाणे निवासस्थानालगतच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चिरंजीव नीळपंठदादा पाटील यांनी त्यांना मुखाग्नी दिला.
कर्मयोगाचे मूर्तिमंत रूप काळाने हिरावले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून श्रद्धांजली
शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त, व्यवस्थापक कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. श्रद्धा आणि कर्मयोगाचे मूर्तिमंत रूप काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. श्री संत गजानन महाराज यांच्या ज्ञान, भक्ती आणि कर्म या त्रिवेणी शिकवणीवर नितांत श्रद्धा ठेवून शिवशंकरभाऊ जगले. त्यांनी आपल्या कर्मयोगातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही संस्थांची बांधणी केली. त्याद्वारे गोरगरीब आणि वंचितांची सेवाही केली. त्यांच्या निःस्वार्थतेचे दाखले हे दंतकथा वाटतील पण ते सत्य आहेत. श्री. गजानन महाराज संस्थानच्या कारभाराचे नियोजन, व्यवस्थापन हा जगभरातील तज्ञांसाठी अभ्यासाचा विषय राहिला आहे. त्यांच्या निधनाने सेवा कार्यासाठी आयुष्य वेचलेला कर्मयोगी काळाने हिरावून नेला आहे.

























































