बेपत्ता मेंढपाळ तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून; कुरुंदवाड येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेंढपाळ तरुणाचा गळा चिरून निर्घृण खून केल्याची घटना शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाडमधील मजरेवाडी येथे घडली आहे. खुनानंतर मृतदेह मजरेवाडी-कुरुंदवाड रस्त्यावर असलेल्या बीपीएड कॉलेजजवळील कुरणी शेतातील झुडपात टाकण्यात आला होता. याप्रकरणी कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सावकार कल्लप्पा देबाजे (वय 35, रा. मजरेवाडी, ता. शिरोळ) असे मृत तरुणाचे नाव आहे.

सावकार देबाजे हा सोमवारपासून (दि. 17) बेपत्ता होता. नातेवाईकांकडून त्याचा शोध सुरू करण्यात आला होता. दरम्यान, मंगळवारी दुपारी कुरुंदवाड मजरेवाडी रस्त्यावरील बीपीएड महाविद्यालय इमारतीजवळील रस्त्यावर सावकारची दुचाकी रस्त्याच्या कडेला दिसली. यावेळी येथील परिसरात शोध घेतला असता गळा चिरलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह काटेरी झुडपात आढळून आला.

याबाबतची माहिती मिळताच कुरुंदवाडचे सहायक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, उपनिरीक्षक अमित पाटील हे फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा सुरू केला. या तरुणाच्या खुनाचे कारण अद्यापि समजू शकले नसले, तरी पोलिसांनी मृतदेहाजवळील मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली असून, या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.