‘जय महाराष्ट्र’ म्हणत शेराचा शिवसेनेत प्रवेश

2037

अभिनेता सलमान याचा अंरक्षक शेरा याने शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेना अध्यक्ष उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शेराच्या मनगटावर शिवबंधन बांधत त्याचे शिवसेनेत स्वागत केले. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून त्यांना संजय दत्त, सुनील शेट्टी सारख्या कलाकारांनी पाठिंबा देत त्यांनाच मत देण्याचे आवाहन केले होते. आदित्य यांच्या उमेदवारीला तसेच शिवसेनेला समाजाच्या विविध स्तरातून जबरदस्त पाठिंबा मिळत असून तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

शेरा याने शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर एका व्हीडिओद्वारे त्याचे मत मांडले. या व्हीडिओमध्ये तो काय म्हणाला ते तुम्हीदेखील पाहा.

शेरा याच्या हातावर शिवबंधन बांधल्यानंतर त्याचे शाल आणि तलवार देऊन स्वागत करण्यात आलं. शेरा याने मातोश्रीवर पाऊल ठेवल्यानंतर सर्वात पहिले हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि नंतर पक्षात प्रवेश केला. त्याच्या प्रवेशावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे देखील उपस्थित होते.

Video – सलमानचा अंगरक्षक शेराचा शिवसेनेत प्रवेश,आदित्य ठाकरेंसाठी प्रचार करणार

कोण आहे शेरा ?
शेरा हा सलमान खान याचा अंगरक्षक म्हणून सर्वांना परिचित आहे. त्याचे खरे नाव गुरमीत सिंग असून गेल्या 20 वर्षांपासून तो सलमानच्या संरक्षणची जबाबदारी चोखपणे बजावत आहे. त्याच्या कर्तव्यनिष्ठेमुळे तो सलमानच्या घरातील एक सदस्यच झाला आहे. शिख कुटुंबात जन्माला आलेल्या शेराला शिक्षणापेक्षा त्याच्या वडिलांसोबत त्यांच्या वर्कशॉपमध्ये काम करायला अवडत होतं. शरीरसौष्ठव हा त्याच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्याने यावरच लक्ष केंद्रीत केलं होतं. त्याने मिस्टर मुंबईचा किताब जिंकला असून मिस्टर महाराष्ट्र स्पर्धेत तो दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या पीळदार शरीरयष्टीमुळे विझक्राफ्ट या कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या कंपनीमध्ये त्याला नोकरी मिळाली. तिथे त्याच्यावर सेलिब्रिटी आणि बड्या लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

मॅट्रीक्स चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला हॉलीवूडचा अभिनेता किआनू रिव्ह्ज याने मुंबईमध्ये एका पार्टीचं आयोजन केलं होतं. 1995 साली या पार्टीमध्ये शेरा आणि सलमान खानची पहिल्यांदा भेट झाली होती. मात्र तिथे या दोघांमध्ये शेराने सलमानच्या अंगरक्षकाची भूमिका स्वीकारावी असं काहीच बोलणं झालं नव्हतं. चंदीगडच्या एका कार्यक्रमात गर्दी हाताबाहेर गेली होती आणि याचा सलमानला त्रास झाला होता. या प्रसंगानंतर सलमानचा भाऊ सोहेल खानने सलमानसाठी अंगरक्षक नेमावा असं मत मांडलं होतं. त्यानेच शेराला सलमानचा अंगरक्षक होशील का असा प्रश्न विचारला, शेराने त्याला झटक्यात ‘हो’ असं उत्तर दिलं होतं. तेव्हापासून शेरा हा सलमानची सावली बनला असून तो सतत त्यासोबत असतो.

आपली प्रतिक्रिया द्या