हिंदुस्थान आक्रमक होऊ शकतो हे सरकारने 370 कलम रद्द करून सिध्द केले!

हिंदुस्थान हा एकसंघ देश आहे आणि या देशातून कोणी फुटून जात असेल तर देश आक्रमक होऊन योग्य ती कारवाई करू शकतो हे सध्याच्या केंद्रशासनाने घटनेतील 370 कलम रद्द करून सिध्द केलंय, अशा शब्दात कश्मीर प्रशनाचे गाढे अभ्यासक, विचारवंत शेषराव मोरे यांनी सरकारची प्रशंसा केली. नरहर कुरूंदकर प्रगत अध्यासन व संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. शेषेराव मोरे यांच्या व्याख्यानाचा विषय होता 370 कलम आले कसे व गेले कसे? या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शेषराव मोरे यांनी आपल्या 50 मिनिटांच्या व्याख्यानात 370 कलमाचा उगम आणि अस्त या विषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले.

370 कलमाविषयी बोलतांना ते म्हणाले की, या कलमात केंद्रशासनाने संरक्षण, दळणवळण आणि कायदा व सुव्यवस्था हे विषय वगळता सर्व विषय राज्यशासनावर सोपवावे अशी तरतूद होती. या शिवाय कश्मीर हा स्वायत्त प्रांत आहे, अशीही तरतूद या कलमान्वये करण्यात आली होती. कश्मीरमधील बहुसंख्य जनतेने पाकिस्तानमध्ये जाऊ नये म्हणून कश्मीरला विशेष दर्जा देणारे हे कलम घटनेत समाविष्ट करण्यास तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी संमती दिली होती असे सांगून ते म्हणाले की, कश्मीर हिंदुस्थानचा भाग आहे ही बाब नेहरूंमुळे शक्य झाली असली तरी कश्मीर हा हिंदुस्थानच्यापुढे एक प्रश्न बनला, ती एक समस्या झाली ती ही नेहरूंमुळेच.

मोरे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कणखर बाण्याने देशातील जवळजवळ 300 संस्थाने विलीन करून घेतली. त्यावेळी कश्मीरचा राजा हरिसिंह कश्मीरचे हिंदुस्थानात विलीनीकरण करण्यास समज होता पण त्यावेळी फाळणीच्या तत्वाच्या नावाखाली कश्मीरी जनतेचे सार्वमत घेण्यात यावे या प्रस्तावास समर्थन मिळाले खरे म्हणजे त्यावेळी सार्वमत घेऊन हा प्रश्न मिरवून टाकला असता तर बरे झाले असते. पण शेख अब्दुल्ला यांच्या प्रेमापोटी नेहरूंनी कश्मीर पाकिस्तानात जाऊ नये म्हणून कश्मीरला विशेष दर्जा दिला आणि घटनेनुसार कश्मीरचे पंतप्रधान म्हणून शेख अब्दुल्लांना नेहरूंनी समर्थन दिले.

370 कलम रद्द करून आणि कश्मीरला केंद्रशासित करून केंद्रशासनाने जम्मू आणि लडाखचा प्रश्न सोडविला आहे. पण मुस्लीमांचे प्राबल्य असलेल्या कश्मीर घाटीचा प्रश्न मिटेल की नाही, याची मला शंका वाटते, असे मतही शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या