
अधिकाराचा वापर करून चाळीस हजारांहून अधिक शेतकऱयांच्या मालकीचा असलेल्या शेतकरी सहकारी संघाच्या मालकीची इमारत जिल्हाधिकाऱयांनी परस्पर नवरात्रोत्सवासाठी ताब्यात घेतल्याने आक्रमक झालेल्या शेतकरी संघाच्या सभासदांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. ‘शेतकरी संघ सभासदांचा, नाही कोणाच्या बापाचा’ अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱयांच्या या निर्णयासह पालकमंत्री दीपक केसरकर यांचा धिक्कार करण्यात आला.
बैलगाडीसह मोर्चात सहभागी झालेल्या सभासदांनी ‘सहकार मोडीत काढणाऱया सरकारचा धिक्कार असो’, ‘सहकार वाचवा’, ‘जिल्हाधिकारी चले जाव’ आदी फलक लक्षवेधी ठरले.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱया भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आपत्ती व्यवस्थापनप्रमुख म्हणून श्री अंबाबाई मंदिरालगतची शेतकरी संघाच्या मालकीची भवानी मंडप येथील तीन मजली इमारत रविवारी ताब्यात घेतली. त्यामुळे शेतकरी संघाचे पदाधिकारी व सभासद आक्रमक झाले. वास्तविक शेतकरी संघ आणि खासगी कंपनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना जिल्हा प्रशासन या इमारतीचा ताबा कोणत्या हक्काने घेऊ शकते, असा सवाल करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय सभासदांनी घेतला होता.
त्यानुसार आज दुपारी भवानी मंडपातील संघाच्या कार्यालयापासून सभासद शेतकऱयांच्या उपस्थितीत शहराच्या प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱयांनी हा निर्णय मागे घ्यावा, या भूमिकेवर शेतकरी सभासद ठाम राहिले.
मोर्चानंतर अशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुरेश देसाई, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, सुनील मोदी, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, प्रवीण इंदुलकर आदींनी जिल्हाधिकाऱयांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी आपल्या निर्णयावर ठाम राहिले. चर्चेअंती शेतकरी संघाने लेखी प्रस्ताव दिल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन कायदा लावून शेतकरी संघाच्या मालकीची इमारत ताब्यात घेतल्याचा आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार मागे घेणार असल्याचे या बैठकीत ठरले.
पालकमंत्री केसरकरांविरोधात बैठकीत रोष
शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत पालकमंत्री दीपक केसरकर यांचा उल्लेख आल्यानंतर शेतकरी, सभासद आणि अशासकीय मंडळाच्या पदाधिकाऱयांमध्ये रोष पाहायला मिळाला. जिल्हाधिकाऱयांना तुमच्यावर पालकमंत्री केसरकर यांचा दबाव आहे का, असा थेट सवाल विजय देवणे यांनी विचारला असता, आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचे रेखावार यांनी सांगितले. यावर शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. कामत नावाची व्यक्ती या ठिकाणी हॉटेल सुरू करणार असल्याची चर्चा असून, राज्य शासनाने अंबाबाई तीर्थक्षेत्राचा आराखडा अजून मंजूर केलेला नाही. पण मंदिराजवळील जमिनीवर शासनाच्या प्रतिनिधींचा डोळा असल्याचा संशय शेतकऱयांनी उपस्थित केला.

























































