‘शेवंता’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना घायाळ करणार! ‘या’ मालिकेतून करणार पुनरागमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाला प्रेक्षकांची लोकप्रियता लाभली. पहिल्या भागात उल्लेख केलेल्या अनेक व्यक्तिरेखा यात दिसल्या. त्यात सगळ्यात जास्त लोकप्रियता लाभली ती शेवंता या व्यक्तिरेखेला. मालिका संपली तरी शेवंताची क्रेझ अद्याप तशीच आहे.

मालिका सुरू असताना शेवंता, तिच्या अदा, तिचं अण्णांना भुलवणं या सगळ्यावर प्रेक्षक भाळले होते. मालिका संपल्यामुळे तिच्या व्यक्तिरेखेला मिस करत होते. पण, आता शेवंताच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रेक्षकांना घायाळ करायला सज्ज झाली आहे.

लवकरच झी युवावरील आगामी मालिकेत ती झळकणार आहे. या मालिकेचं नाव ‘तुझं माझं जमतंय’ असं असून त्यात अपूर्वा ‘पम्मी’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. पम्मी ही व्यक्तिरेखाही शेवंताप्रमाणेच बोल्ड व्यक्तिरेखा असून अपूर्वा पुन्हा एकदा प्रेक्षकांना क्लिन बोल्ड करायला सज्ज झाली आहे. या मालिकेचा बाज विनोदी असून पम्मी ही व्यक्तिरेखा त्याला ग्लॅमरचा तडका देणार आहे. या मालिकेत अजून कोण कलाकार तिच्यासह झळकणार आहेत, ते अद्याप गुलदस्त्यात असून लवकरच त्याचा उलगडा होणार आहे.