
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणी विशेष पीएमएलए न्यायालयाने मिंधे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर, बिल्डर जुगल किशोर तापडिया, व्यावसायिक पद्माकर मुळये यांच्यासह इतर आरोपींना समन्स बजावले आहे. या आरोपींना 12 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे सक्त आदेश दिले आहेत.
ईडीने ऑगस्टच्या अखेरीस दोन स्वतंत्र पुरवणी आरोपपत्रे दाखल केली होती. त्या आरोपपत्रांची गंभीर दखल घेताना विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी आरोपींना समन्स जारी केले आहे. आरोपींनी आर्थिक अफरातफर केल्याचे प्रथमदर्शनी पुरावे दिसून येतात. अनेक अनावश्यक अर्थिक व्यवहार करून आर्थिक अफरातफर करण्यात आल्याचा ठपका ईडीने आरोपपत्रांद्वारे ठेवला आहे. ईडीच्या या दाव्यात प्रथमदर्शनी तथ्य आहे, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. मिंधे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर हे जालना सहकारी साखर कारखान्याशी संबंधित कोटय़वधी रुपयांच्या आर्थिक अफरातफरीमुळे गोत्यात आले आहेत. ईडीने पुरवणी आरोपपत्रात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांच्या आधारे न्यायालयाने खटला चालवण्यासाठी आरोपींना समन्स जारी केले आहेत.

























































