शिखर सावरकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संजीवनी धुरी-जाधव,[email protected]

हिमालयातील अनवट शिखरं… या पांढऱया शिखराला नुकतेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे नाव देण्यात आले.. काय आहे ही मोहीम….

स्वा. सावरकरांचे 50 वे आत्मार्पण स्मृतिवर्ष साजरे करण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून सावरकरप्रेमी एकत्र आले होते. त्या वेळी गिर्यारोहक देवेंद्र गंद्रे यांना एक संकल्पना सुचली. ते संपूर्ण सह्याद्री आणि हिमालयात अनेकदा भटकंती करत असतात. हिमालयातील बहुतेक शिखरांना देवीदेवतांची, नद्यांची नावे आहेत. पण एखाद्या क्रांतिवीराच्या नावाने ओळखले जावे असे एकही शिखर नव्हते. ही संकल्पना त्यांनी सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, स्मारकाच्या आणि इंडियन माऊंटेनीअरिंग फाऊंडेशनच्या सदस्या के. सरस्वती यांना सांगितली आणि त्यांना ती खूपच आवडली. हिमालयीन मोहिमा फार खर्चिक असतात, पण सावरकर स्मारकाकडून त्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले होते. स्मारकाच्या पाठिंब्यामुळे ते मोहिमेच्या तयारीस लागले.

अनेक आव्हाने समोर होती

हिमाचल प्रदेशातील बातलपासून जवळच असलेल्या ‘वर्चा नाला’ परिसरातील 6060 मीटर  आणि 19 हजार 881 फूट उंचीचे एका अनामिक हिमशिखराची मोहिमेकरिता निवड केली. या मोहिमेत पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून एकूण 7 उत्कृष्ट गिर्यारोहकांची निवड केली होती. त्यामध्ये मोहिमेचे नेतृत्त्व देवेंद्र गंद्रे यांनी केले.  या मोहिमेबाबत गंद्रे यांना विचारले असता ते म्हणाले, मनाली येथून 10 ऑगस्ट 2015 मोहिमेला सुरुवात केली. अनेक आव्हाने समोर होती.  अत्यंत धोकादायक परिस्थिती, खालावलेले तापमान, अनेक प्रकारचे नैसर्गिक आणि मानवनिर्मित धोके यांचा सामना करावा लागला. या अजिंक्य हिमशिखरावरील चढाईचा मार्ग हा या परिसरातील इतर शिखरांच्या तुलनेत अत्यंत धोकादायक असल्यामुळेच हे शिखर कोणी सर केले नव्हते. सर्व परिस्थितीला तोंड देत पुढे गेलो. त्या शिखराचे वैशिष्टय़ म्हणजे त्या शिखरावर बर्फच नाही आणि जो बर्फ आहे तो अगदी वर होता. त्यामुळे परिस्थिती आणखी कठीण होती. आम्हा गिर्यारोहकांसाठी बर्फ असेल तर उत्तम असतं. कारण पायात स्नोबूट घातलेले असतात त्याच्या मदतीने आम्ही शिखर सर करतो. पण तिकडे तसे शक्यच नव्हते. मोठमोठय़ा दगडांवरून आम्ही सरकत होतो. पण तरीही प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर 23 ऑगस्ट 2015 रोजी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी शिखर सर करण्यास यश मिळाले. सावरकरांचा जोरदार जयघोष करत स्वा. सावरकर संकल्पित पहिला राष्ट्रध्वज फडकविण्यात आला.

पर्यटकांना हा स्मृतिफलक पाहता येणार

हिंदुस्थान सरकारमार्फत गिर्यारोहण मोहिमांचे नियंत्रण करणाऱया इंडियन माऊंटेनीअरिंग फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्याकडे महत्त्वाचे काम असते. कारण आपण शिखराला नाव देतो त्यावर या संस्थेकडून शिक्कामोर्तब होते. सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याशी सल्लामसलत आणि आवश्यक सोपस्कार केल्यानंतर हिमशिखराला सावरकरांचे नाव देण्याचा मार्ग मोकळा झाला होता. त्यानंतर ऑगस्ट 2018 मध्ये पुन्हा एकदा स्व. सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित एका वेगळय़ा गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झालो होतो. 30 ऑगस्ट 2018 या दिवशी हिमालयातील बातल भागातील त्यांनी सर केलेल्या अनामिक शिखराच्या पायथ्याशी ‘शिखर सावरकर’ या नावाचा स्मारक स्मृतिफलक तिथे बसवला. या वेळी त्यांच्यासोबत शिखर सावरकर मोहिमेतील राजेंद्र कराडकर आणि आनंद शिंदे होते. आम्ही तिथे छोटेसे स्मारक स्मृतिफलक तिथे बसवला. त्या भागातून अनेक पर्यटक पुढे चंद्रताल लेक पाहण्यासाठी जात असतात. तिथेच पाटी असल्याने सगळे जण उभे राहून फोटो काढत असल्याचे देवेंद्र गंद्रे सांगतात.

आता मोहीम पूर्ण झाली…

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आत्मार्पण स्मृतिवर्ष म्हणून 2015 हे वर्ष सर्वत्र साजरे केले होते. त्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने सर्व सावरकरप्रेमींना एकत्र आणले होते. त्यानिमित्ताने ते वर्ष विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर साजरे केले. वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्या वेळी देवेंद्र गंद्रे यांनी शिखर सावरकर ही त्यांची संकल्पना आम्हाला सांगितली आणि आम्हाला ती आवडली. त्यानंतर इंडियन माऊंटेनीअरिंग फाऊंडेशनशी त्यासाठी पत्रव्यवहार केला आणि मोहिमेला सुरुवात झाली. 23 ऑगस्ट 2015 ला आम्हाला ते शिखर सर करायला यश मिळाले. पण हल्लीच सावरकर राष्ट्रीय स्मारक आयोजित एका वेगळय़ा गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झालो होतो. 30 ऑगस्ट 2018 या दिवशी हिमालयातील बातल भागातील आम्ही सर केलेल्या अनामिक शिखराच्या पायथ्याशी ‘शिखर सावरकर’ हा नामफलक बसवण्यात आला. त्यामुळे खऱया अर्थाने ‘शिखर सावरकर’ मोहीम पूर्ण झाली. या वेळी देवेंद्र गंद्रे आणि आनंद शिंदे यांच्या सोबत या दोन्ही वेळेला मी सहभागी होतो अशी माहिती स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर यांनी दिली.