मी नैराश्यग्रस्त असताना हिंदुस्थानात परतले, माझे डोके भिंतीवर आपटावे असे सतत वाटायचे! शिल्पा शिरोडकर

शिल्पा शिरोडकर ही 90 च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक होती. तिने अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आणि ब्लॉकबस्टर चित्रपटही दिले. तिच्या चित्रपटांमध्ये ‘हम’, ‘आंखें’, गोपी-कृष्ण आणि ‘खुदा गवाह’ सारखे हिट चित्रपट समाविष्ट आहेत. परंतु तिने मात्र तिच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना बॉलिवूडला रामराम केला. लग्न करुन तिने परदेशात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. अलीकडेच तिने एका मुलाखतीत तिच्या एकूणच कारकिर्दीसोबत वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी तिच्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत शिल्पा शिरोडकरने सांगितले की, अपरेश रणजीत (बँकर आणि डबल एमबीए) शी लग्न केल्यानंतर तिचे आयुष्य बदलले. लग्नानंतर ती न्यूझीलंडला गेली आणि तिला या निर्णयाचा कधीही पश्चात्ताप झाला नाही. ती म्हणाली, “मला ब्रेक घेतल्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. मी एका अतिशय गोड, छान आणि साध्या व्यक्तीशी लग्न केले आणि माझे आयुष्य सुरू करण्यासाठी मला हेच हवे होते.”

शिल्पा येत्या काही दिवसांमध्ये ‘शंकर’ या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु शिल्पा ज्यावेळी हिंदुस्थानामध्ये परत आली त्यावेळी मात्र तिची मानसिक अवस्था अतिशय भीषण होती. याविषयी बोलताना शिल्पा म्हणते, जेव्हा मी हिंदुस्थानात परतले त्यावेळी माझी मानसिक स्थिती अजिबात चांगली नव्हती. मी माझे पालक गमावले होते आणि मी खूप नैराश्यात होते. मला फक्त त्यावेळी नम्रताला सोबत द्यायची होती म्हणूनच मी हिंदुस्थानात परत आले. माझ्या मनात कामाबद्दल कोणताही विचार नव्हता” असे तिने पिंकव्हिलाशी झालेल्या संभाषणात सांगितले. यावर अधिक बोलताना ती म्हणाली, मला माझे डोके भिंतीवर आपटून स्वतःला संपवावे असे वाटत असे. या काळामध्ये तिला तिच्या नवऱ्याने आणि बहिणीने नम्रताने फार मोलाची साथ दिल्याचेही ती म्हणते.

शिल्पाने तिचे लग्न कसे ठरले यावरही भाष्य केले आहे. ती म्हणाली की, तिच्या पतीला भेटल्यानंतर मुंबई सोडण्याचा निर्णय तिच्यासाठी सोपा झाला. ती म्हणाली, “मी कधीही मुंबई सोडू इच्छित नव्हते कारण मी माझ्या पालकांच्या खूप जवळ होते, परंतु नंतर मी माझ्या पतीला भेटले आणि दीड दिवसात मी त्याला होकार दिला.” ती पुढे म्हणाली, “तो शिक्षणासाठी परदेशात जाणार होता… मला त्याचा प्रामाणिकपणा इतका आवडला की, मी काय करतेय हे देखील मला समजलेही नाही.”

शिल्पाने तिच्या शिक्षणाबद्दल एक आश्चर्यकारक खुलासाही केला. शिल्पाने सांगितले. “मी दहावीत नापास झाले आहे. माझा नवरा बँकर आहे. त्याने डबल एमबीए केले आहे आणि तो खूप शिक्षित आहे. शिल्पाने हिंदुस्थानात आल्यानंतर काही दिवसांनी बिग बाॅस या रिअॅलिटी शो मध्ये भाग घेऊन सर्वांचीच मने जिंकली होती.