
सामना प्रतिनिधी । मुंबई
जोगेश्वरीमध्ये अलीकडेच लोकार्पण करण्यात आलेल्या ‘शिल्पग्राम’मध्ये आज पर्यटक-रहिवाशांची प्रचंड झुंबड उडाली. 25 हजारांवर लोकांची गर्दी झाली असताना कोणतीही सुरक्षा नसल्यामुळे अनेक लहान मुले हरवली. काही उपद्रवी पर्यटकांनी झाडे आणि वास्तूंची नासधूस करण्याचा प्रयत्न केला, मात्र शिवसैनिकांनी या ठिकाणी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवल्याने नुकसान टळले.
बारा बलुतेदारांसह महाराष्ट्राची कला-संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडवणारे शिल्पग्राम पर्यटक-रहिवाशांसाठी पर्वणी ठरली आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून हे महत्त्वाकांक्षी काम करण्यात आले आहे. दिल्ली हाट, हैदराबादचे शिल्पग्राम, सवाई माधवपूरच्या धर्तीवर तब्बल 55 हजार चौरस मीटर जागेवर हे शिल्पग्राम उभारण्यात आले आहे. मोफत असणाऱया या शिल्पग्रामध्ये पालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नसल्याने आज रविवारी पर्यटकांची झुंबड उडाली. यामध्ये काही उपद्रवी पर्यटकांचाही समावेश होता. या समाजकंटकांनी गर्दीचा फायदा उचलत गोंधळ घालण्याचा प्रयत्नही केला, मात्र शिवसैनिकांनी या ठिकाणी धाव घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवल्याचे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी मुलांना सुरक्षित घरी सोडले
प्रचंड गर्दीत आठ लहान मुले हरवली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या सर्व मुलांना शिवसैनिकांनी सुरक्षित घरी सोडले. अशा परिस्थितीमुळे या ठिकाणी पालिकेने सुरक्षेच्या कडेकोट उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी सांगितले. यावेळी शाखाप्रमुख नंदकुमार ताम्हणकर, मंदार मोरे, उदय हेगिष्टे, शंकर दवंडे, केशव चव्हाण, रमेश यादव यांच्यासह शिवसैनिकांनी या ठिकाणी धाव घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळवले.





























































