
बोईसरमधील शिंदे गटाचा पदाधिकारी सौरभ आप्पा याने सरकारी नोकरीचे आमिष दाखवून एका तरुणाचे २ लाख २० हजार रुपये हडप केले होते. आर्थिक फसवणूक झालेल्या तरुणाच्या बहिणीच्या तक्रारीनुसार सौरभ आप्पा याच्या विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
मंत्रालयात लिपिकाची नोकरी लावतो, असे आमिष दाखवून सौरभ आप्पा याने विक्रमगड तालुक्यातील आलोंडे येथील विक्रांत ठाकरे याच्याकडे पाच लाखांची मागणी केली होती. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विक्रांतने नातेवाईक व मित्रांकडून दोन लाख वीस हजार रुपये घेऊन सौरभ आप्पाला दिले. मात्र पैसे दिल्यानंतर नोकरीचा विषय आप्पा टाळू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विक्रांतने पैसे परत मागण्यास सुरुवात केली. यासाठी विक्रांतने सौरभ आप्पा याच्या बोईसर येथील कार्यालय व निवासस्थानी अनेक वेळा फेऱ्या मारल्या. मात्र पैसे परत मिळत नव्हते.
पैसे मिळत नसल्यामुळे विक्रांत मानसिक तणावात होता. २१ मार्च २०२४ रोजी बोईसर येथून विक्रमगड येथे घरी परतत असताना विक्रांतचा अपघाती मृत्यू झाला. विक्रांतच्या मृत्यूनंतर त्याची विवाहित बहीण मयुरी लाटे हिने बोईसर पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दिली.