
शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सना मारहाण करणारा शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे याचा जामीन उच्च न्यायालयाने शनिवारी स्थगित करत त्याला रविवारी पाच वाजेपर्यंत पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार आज म्हात्रे डोंबिवलीतील विष्णूनगर पोलिसांना शरण आला. यानंतर पोलिसांनी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायाधीश एन. पी. कासाडे यांनी म्हात्रेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानुसार ३ ऑगस्टपर्यंत म्हात्रेचा मुक्काम आधारवाडी कारागृहात राहणार आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रमेश म्हात्रेचे धाबे दणाणले आणि आज दुपारी साडेतीन वाजताच विष्णूनगर पोलीस ठाण्यात त्याने हजेरी लावली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. शास्त्रीनगर रुग्णालयातील राड्याला जबाबदार असलेल्या साधना करांडे या महिलेला विष्णूनगर पोलिसांनी आज अटक केली. त्यांना कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ७ जुलै रोजी साधना करांडे यांच्या गर्भवती मुलीला प्रसूतीसाठी शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टर आणि परिचारिकांच्या मारहाणीच्या संपूर्ण घटनाक्रमाला करांडेसुद्धा जबाबदार असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या आता पाच झाली आहे.
डॉक्टरांचा राज्यव्यापी बंद मागे
डॉक्टर व परिचारिकांना केलेल्या बेदम मारहाणीच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने सोमवारी राज्यभर २४ तासांचा कामबंद आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. मात्र रुग्णांचे हित लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आव्हानाला प्रतिसाद देत बंद मागे घेत असल्याची माहिती आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि राज्य खजिनदार डॉ. अमोल गीते यांनी दिली. संप मागे घेतल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे.































































