मिंधे सरकारचे नियोजन कोलमडले!अर्थसंकल्पानंतर तीन महिन्यांतच 41 हजार कोटींच्या पुरवणी मागण्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फोडाफोडीचे राजकारण सत्तेत आलेल्या मिंधे सरकारचे नियोजन कोलमडले आहे. यामुळे अर्थसंकल्पानंतर 3 महिन्यांतच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तब्बल 41 हजार 243 कोटी 21 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. यात राज्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱयांना सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या तीन हप्त्यांची थकबाकी आणि चौथा हप्ता अदा करण्यासाठी 3 हजार 563 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

राज्याचे वित्त नियोजन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सन 2023-24 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. 41 हजार 243 कोटींच्या पुरवणी मागणीत 13 हजार 91 कोटी अनिवार्य खर्चाच्या, 25 हजार 611 कोटी रुपये कार्यक्रमा अंतर्गत खर्चाच्या तर 2 हजार 540 कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमा अंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आहे. या पुरवणी मागण्यांवर पुढील आठवडय़ात 24 आणि 25 जुलैला चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील.

पुरवणी मागणीत जल जीवन मिशन योजनेसाठी सर्वाधिक म्हणजे 5 हजार 856 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने सन 2023-24च्या अर्थसंकल्पात पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱयांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत देणारी योजना घोषित केली होती. त्यानुसार पात्र लाभार्थी शेतकऱयांना मदत देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱयांच्या बँक खात्यात जुलैअखेरपर्यंत मदतीचे पैसे जमा होण्याची शक्यता आहे. आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शहरी तसेच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातील एक हजार कोटी शहरी भागातील लोकप्रतिनिधींना तर दीड हजार कोटी रुपये ग्रामीण भागातील आमदारांना मिळणार आहेत.

राज्य सरकारने श्रावणबाळ आणि संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱया निवृत्ती वेतन योजनेत वाढ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार या दोन्ही योजनेसाठी अनुक्रमे 1 हजार 900 आणि 600 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय एसटी परिवहन महामंडळाला  सवलत मूल्य आणि अर्थसहाय्य म्हणून एक हजार कोटी, अंगणवाडी कर्मचाऱयांच्या मानधनासाठी केंद्र, राज्य आणि अतिरिक्त हिस्सा म्हणून 939 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.

पुरवणी मागणीतील अन्य तरतुदी

मेट्रो रेल्वे प्रकल्प मुद्रांक शुल्क अधिभाराचे प्रदान करण्यासाठी 2 हजार 100 कोटी रुपये

पंधराव्या वित्त आयोगाच्या अंतर्गत अनुदान देण्यासाठी 1 हजार 398 कोटी रुपये

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य म्हणून 1 हजार 200 कोटी रुपये

खातेनिहाय निधी

 नगरविकास – 6 हजार 224 कोटी

 पाणी पुरवठा आणि स्वच्छता    –    5 हजार 873 कोटी

 कृषी आणि पदुम    –    5 हजार 219 कोटी

 शालेय शिक्षण आणि क्रीडा –    5 हजार 121 कोटी

 सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य     –    4 हजार 244 कोटी

 सार्वजनिक बांधकाम    –    2 हजार 98 कोटी

 ग्रामविकास   – 2 हजार 70 कोटी

 आदिवासी विकास –    1 हजार 622 कोटी

 महिला आणि बालविकास   –    1 हजार 597 कोटी

 सार्वजनिक आरोग्य      –    1 हजार 187 कोटी

नमो शेतकरी योजनेसाठी 4 हजार कोटी

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील पात्र शेतकऱयांसाठी चार हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील लेट खरीप हंगामातील लाल कांदा विक्री केलेल्या पात्र शेतकऱयांना अनुदान म्हणून 550 कोटी, पात्र सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन उपलब्ध करून देण्यासाठी 549 कोटी तर केंद्रीय आधारभूत किंमत योजनेखालील तूट भरून काढण्यासाठी 523 कोटी रुपयांचा निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे.