
सफरचंद हे एक पौष्टिक फळ मानलं जातं. म्हणूनच कदाचित रोज एक सफरचंद खाल्लं तर डॉक्टरांना दूर ठेवता येतं, असं म्हणतात. त्यासाठी आपण बाजारात ताजी सफरचंद मिळतील याकडे कटाक्षाने लक्ष पुरवतो. पण, बऱ्याचदा ताजी फळं आणायच्या नादात आपण चमकदार साल असलेली सफरचंद घेऊन येतो. त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, असं एका अहवालात उघड झालं आहे.
हा अहवाल दिल्ली विद्यापीठ, मॅकमास्टर विद्यापीठ आणि कॅनडाच्या काही संशोधकांनी केलेल्या एका संशोधन अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. हा अहवाल अमेरिकन सोसायटीच्या मायक्रोबायोलॉजी जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार, चमकदार साल असलेल्या सफरचंदामुळे जीवाचा धोका असू शकतो.
या अहवालासाठी बाजारातून 42 आणि बगिच्यातून 20 अशी 62 सफरचंद अभ्यासण्यात आली. त्यातील 8 सफरचंदांच्या सालावर कँडिडा ऑरिस नावाची बुरशी आढळली. फळांना अधिक काळ ताजं ठेवण्यासाठी जे रसायन वापरलं जातं, त्या रसायनामुळे सफरचंदाच्या सालावर कँडिडा ऑरिस ही बुरशी तयार होते.
थेट बगिच्यातून आणलेल्या सफरचंदावर कँडिडा ऑरिस आढळली नव्हती. बाजारातून आणलेल्या सफरचंदांवर ही बुरशी विकसित झाली होती. कारण, फळविक्रेते सफरचंदं ताजी राहावीत म्हणून त्यावर रसायनं फवारतात. त्यामुळे ही बुरशी विकसित होते.
पण, ही बुरशी रोगप्रसारासाठी सर्वाधिक घातक मानल्या गेलेल्या 5 कवकांच्या यादीत येते. ही बुरशी शरीरात गेल्यास शरीरातील अंतर्गत अवयवांवर प्रभाव टाकते. ही बुरशी शरीरात गेल्यास ताप आणि थंडी भरून येणं अशी लक्षणं दिसतात. वेळीच इलाज केला नाही तर ही बुरशी रक्तात मिसळते आणि त्यामुळे जिवाचा धोका उद्भवू शकेल असे गंभीर आजार होऊ शकतात.


























































