
देशभरात कोरोनाची दुसरी लाट आलीय. कोरोनाला आळा घालण्यासाठी वैद्यकीय तसेच सरकारी यंत्रणा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा जसा उपयोग आहे त्याचप्रमाणे प्लाझ्मा उपचार प्रणालीचा उपयोगदेखील करण्यात येतो. म्हणूनच प्लाझ्मादानाबाबत जनजागृतीचा अनोखा प्रयत्न शिवडी येथे करण्यात आला.
कोरोनमुक्त रुग्ण डिस्चार्ज मिळाल्यानंतर 28 दिवसांनंतर ते तीन महिन्यांच्या आत प्लाझ्मादान करू शकतो, मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी प्लाझ्मादान आणि त्याचा प्रसारदेखील होणे गरजेचे आहे. म्हणून पंकज लक्ष्मण म्हेतर या शिवसैनिकाने चक्क एक प्रचार आणि प्रसार मोहीम आखली आणि त्याच्या या प्रयत्नांना साथ मिळाली ती शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची. या मोहिमेत एक वाहन सात दिवस संपूर्ण शिवडी, लालबाग, परळ, डिलाईल रोड या विभागात प्लाझ्मादानाचा प्रसार व प्रचार करत फिरले. दत्ता जाधव, उमेश पुंगावकर आदींनी ही मोहीम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला.




























































