काल्याच्या कीर्तनाने साईंच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता

साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या वतीने 14 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या साईबाबांच्या पुण्यतिथी उत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून करण्यात आली.

पुण्यतिथी उत्सवाच्या सांगतादिनी पहाटे 4.30 वाजता काकड आरती, त्यानंतर पहाटे 5 वाजता साईबाबांचे मंगलस्नान व ‘शिर्डी माझे पंढरपूर’ ही आरती झाली. सकाळी 6 वाजता संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त संजय धिवरे यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपूजा व गुरुस्थान मंदिरात रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता मंदिर पुजारी उल्हास वाळुंजकर यांचे गोपालकाल्याचे कीर्तन झाले. काल्याच्या कीर्तनानंतर समाधी मंदिरात उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे व संजय धिवरे यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व मंदिर पुजारी आणि कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी 12.10 वाजता माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी 6.15 वाजता धुपारती, तर रात्री 10.30 वाजता शेजारती झाली.

पुण्यतिथी उत्सव यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणायत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य लेखाधिकारी बाबासाहेब शिंदे, प्रशासकीय अधिकारी डॉ. आकाश किसवे, दिलीप उगले, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, सर्व विभाग प्रमुख व कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले.

भिक्षा झोळीत भरभरून दान…

पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी रूढी-परंपरेनुसार आयोजित करण्यात आलेला प्रतीकात्मक भिक्षा झोळीत ग्रामस्थ व साईभक्तांनी भरभरून दान दिले. यामध्ये गहू, तांदूळ, बाजरी, ज्वारी, तूरदाळ व हरभरादाळ असे सुमारे 150 पोते धान्यरूपाने आणि रवा, गूळ, साखर व खाद्यतेल आदींद्वारे 3 लाख 38 हजार 266 रुपये व 1 लाख 26 हजार 708 रुपये रोख, तर शाल, बेडशीट आदी वस्त्रांद्वारे 997 रुपये अशी एकूण 4 लाख 65 हजार 971 रुपये देणगी भिक्षा झोळीद्वारे प्राप्त झाली.