अडीच दिवसांत 40 हजार भाविकांनी घेतले साई दर्शन

सलग सुटय़ांमुळे शिर्डीत साईदर्शनासाठी येणाऱया भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून, दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. ‘ऑनलाइन बुकिंग करूनच दर्शनासाठी या’ असे आवाहन साईबाबा संस्थानने करूनदेखील गर्दी वाढत आहे. गेल्या अडीच दिवसांत 40 हजारांहून अधिकांनी साईदर्शन घेतले.

साई मंदिरात प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, ऑफलाइन पास काढून दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने मंदिराच्या बाह्य परिसरात लांबच लांब रांगा दिसत आहेत. आरतीवेळी दर्शन बंद असल्याने त्या काळात गर्दी अधिकच वाढत आहे.

सुटीच्या दोन दिवसांत 30 हजार, तर रविवार दुपारपर्यंत 10 हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नवीन वर्षाचे स्वागत साई दर्शनाने करण्यासाठी भाविकांची 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी रोजी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • दरवर्षी वर्षाखेरीस शिर्डीत गर्दी होतेच. नाताळच्या सुट्टय़ांपासून सुरू झालेली ही गर्दी नवीन वर्षाचे स्वागत करेपर्यंत राहते. शिर्डीतील व्यावसायिकांंसाठीही हा उत्तम काळ असतो. साईबाबा संस्थानलाही या काळात मोठय़ा प्रमाणात देणगी मिळत असते. या वर्षी मात्र कोरोनाचे सावट आहे. मंदिर खुले झाल्यापासूनच शिर्डीत ऑनलाइन दर्शन बुकिंगची सोय करण्यात आली आहे. नियम पाळून प्रत्यक्ष दर्शन घेऊ शकणाऱया भाविकांचा कोटा ठरविण्यात आला आहे. त्यानुसार दररोज सुमारे बारा हजार भाविक दर्शन घेऊ शकतात. आता ही संख्या पंधरा हजार करण्यात येत आहे. ऑनलाइन बुकिंग न करता आलेल्यांसाठी म्हणून काही कोटा थेट मंदिरात आलेल्यांसाठी ठेवण्यात आलेला आहे. नाताळच्या सुट्टीपर्यंत हे सुरळीत सुरू होते. मात्र सुट्टी सुरू झाल्यानंतर भाविकांचा शिर्डीकडे ओढा वाढला आणि नियोजनावर ताण आला आहे. त्यामुळे वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या