
सामना प्रतिनिधी । शिर्डी
साईबाबा संस्थानचे कंत्राटी कामगार 17 वर्षापासून कायम होण्याची स्वप्ने पाहात आहेत. मात्र संस्थानने जवळपास 306 कर्मचाऱ्यांची वर्षापूर्वी दिलेली 40 टक्के पगार वाढ ऑगस्ट पासून थांबवण्याबाबत एजन्सीला कळवून कामगारांना शॉक दिला आहे.
वर्षभरापूर्वी संस्थानने इनसोर्सच्या कंत्राटी कामगारांना 40 टक्के पगार वाढ दिली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांना किमान 10 हजाराच्या आसपास पगार झाला होता. मात्र संस्थानने गेल्या फेब्रुवारी ते एप्रील या तीन महिन्यांची सरासरी गैरहजेरी काढून वेतनवाढ बंद केली आहे. या कामगारांची वेतनवाढ करू नये अशी विनंती साईबाबा संस्थानातील असंघटीत कर्मचारी संघटनेने केली आहे.
गैरहजेरीची सरासरी केवळ 3 महिन्यावर आधारीत असल्याने बहुतांश कंत्राटी कामगारांवर अन्याय करणारी आहे. कर्मचाऱ्यांचे गैरहजेरीचे प्रमाण किती असावे याबाबत एजन्सीकडून कामगारांना कोणतीही सूचना देण्यात आलेली नाही. तसेच कामगारांना सुट्टी घ्यायची असल्यास ती कशी घ्यावी याबाबतही कार्यपद्धती निश्चित नाही. कर्मचाऱ्यांनी एजन्सीला सुट्टी मागितल्यास त्यांना विभाग प्रमुखांची परवानगी घेण्यास सांगण्यात येते. मात्र गैरहजेरीचे प्रमाण तपासतांना संबधित विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिकारात दिलेल्या सुट्ट्या किंवा त्यांचा अभीप्राय विचारात घेण्यात आला नाहीत असे संघटनेचे म्हणणे आहे.
दरम्यान, कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखतांना या कामगारांनी रजेचा अर्ज दिला होता का, परवानगी घेतली होती का याबाबतही शहानिशा न करताच 306 कामगारांची पगारवाढ रोखण्यात आली आहे. या कामगारांना एकदा संधी देऊन गैरहजेरीचे प्रमाण काढतांना किमान वर्षभराची सरासरी काढावी अशी विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संस्थान कडे प्रतिनियुक्तीवर असलेले उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काही अधिकारी वरीष्ठांची दिशाभुल करत असल्याची चर्चा आहे. प्रशासनाच्या आठमुठ्या धोरणामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे.




























































