
शिर्डी विकास सोसायटीच्या वार्षिक अहवालात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आतील पानांमध्ये छापण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह नगराध्यक्ष आणि माजी अध्यक्षांचेही फोटो या अहवालात नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी हा अहवाल फाडत सभास्थळी निषेधाच्या घोषणा दिल्या.
मीनाक्षी प्रमोद गोंदकर यांच्या अध्यक्षतेखाली आज शिर्डी विकास सोसायटीची वार्षिक सभा आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, सुजित गोंदकर, प्रताप जगताप, अभय शेळके-पाटील, दिगंबर कोते, रमेश गोंदकर, बाबासाहेब कोते, सुधाकर शिंदे, नीलेश कोते यांच्यासह संस्थेचे सभासद, संचालक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
संस्थेच्या अहवालातील फोटोच्या मुद्दय़ावरून शिवसेना व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधारी गटाला जाब विचारला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय शिंदे, शहरप्रमुख सचिन कोते, विजय जगताप यांच्यासह शिवसैनिकांनी सभास्थळी अहवाल फाडून निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी कैलास कोते भाषण करत असताना संस्थेचे माजी अध्यक्ष प्रताप जगताप आणि संचालक अप्पासाहेब कोते, ज्ञानेश्वर गोंदकर यांच्यात शाब्दिक चकमकी झाल्या.
































































