म्हातारा न इतुका…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

एकदा चाळिशीतील मित्रांचा ग्रूप भेटला. त्यांनी ठरविलं का, ‘रीयुनियन’ पार्टी करायची. कुठं करावी? सर्वानुमते ठरले की, हॉटेल सी व्हय़ूमध्ये. कारण तिथल्या वेट्रेसेस चिकन्या आहेत.
दहा वर्षांनंतर पन्नाशीला हा ग्रूप पुन्हा भेटला. त्यांनी ठरविलं की, ‘रीयुनियन’ पार्टी करायची. कुठं करावी? सर्वानुमते ठरले की, हॉटेल सी व्हय़ूमध्ये. कारण तिथलं जेवण मस्त व चविष्ट असतं.
आणखी दहा वर्षांनंतर साठीतला हा ग्रूप पुन्हा भेटला. त्यांनी ठरविलं की, ‘रीयुनियन’ पार्टी करायची. कुठं करावी? सर्वानुमते ठरले की, हॉटेल सी व्हय़ूमध्ये. कारण वरून सूर्यास्त, समुद्रकिनारा मस्त दिसतात.
आणखी दहा वर्षांनी सत्तरीतला हा ग्रूप पुन्हा भेटला. त्यांनी ठरविलं की, ‘रीयुनियन’ची पार्टी करायची. कुठं करावी? सर्वानुमते ठरले की, हॉटेल सी व्हय़ूमध्ये. कारण हॉटेलला लिफ्ट आहे.
आणखी दहा वर्षांनी ऐंशीच्या घरातील हा ग्रूप पुन्हा भेटला. त्यांनी ठरविलं की, ‘रीयुनियन’ पार्टी करायची. कुठं करावी? सर्वानुमते ठरले की, हॉटेल सी व्हय़ूमध्ये. कारण सी व्हय़ूमध्ये आपण कधीच गेलेलो नाही.
आमच्या सत्तरीतल्या शिवाजी पार्कवरच्या ग्रूपला मी हा विनोद सांगितला. कोणीच हसलं नाही. जी फॅक्ट आहे तो विनोद कसा होऊ शकतो? शानबाग गंभीर होत म्हणाला, ‘लिफ्ट आहे ते बरं आहे, टेरेसपर्यंत कोण जिना चढत जाणार?
माने म्हणाला, ‘जेवणाचं काय सांगताय? कोण ते चिकन, मटण, बिर्याणी आणि रावस खाणार? मी तर अलीकडे सोडलंय. पचत नाही. त्यातून ते महाग किती असेल. आपण टेरेसवर नुसत्या टेबलखुर्च्या बुक करूया. घरून जेवणाचा डबा घेऊन जाऊ या. आमची ही धिरडं काय अप्रतिम करते. सूनबाई नाकं मुरडते व चापून खाते.
सरपोतदार म्हणाला, ‘सूर्यास्त व समुद्रकिनारा बघण्यात आपल्याला काही रस नाही बा. इथून ‘पार्क वे’ हॉटेलवरून सरळ चालत गेलं की, सूर्यास्त व समुद्रकिनारा पाहायला मिळतो. तोही फुकट.’
शिलोश्री म्हणाला, ‘अजूनही त्या तरुण पोरी तिथं वेट्रेसेस म्हणून असतील का रे?’
मी म्हणालो, ‘असतील, पण त्या आता म्हाताऱया झाल्या असतील. पाठीला रेटा देऊन त्यांना उठावं लागत असेल. डोळय़ांवर सोडावॉटरच्या बाटल्यांच्या जाडीचा चष्मा आला असेल. समोर पदार्थांची डिश ठेवताना त्यांचा हात थरथरत असेल. खोकल्याची उबळ आली की बघायलाच नको.’
माझ्या अवसानघातकी वक्तव्यानं आमचा ग्रूप पुरता नामोहरम झाला. आम्हाला पटलंय की, कुठं जाणं नको, येणं नको. गपगार कट्टय़ावर समाधी लावून बसायचं आणि जाण्यायेणाऱया कॉलेजकन्यका न्याहाळायच्या. यासारखा कृतीशून्य, निर्हेतुक, विनासायास, निरुपद्रवी, बिनखर्चिक आनंद नाही. त्यातून एखाद्या पोरीनं आपल्याला बघताना पाहिलं तर लगेच तिला विचारायचं- ‘ए काय गं, आजोबा काय म्हणतायत?’ क्षणात तिच्या डोळय़ांतील संशय दूर होईल. आपलं न्याहाळणं पुढे चालू…
परवा माझा अमेरिकास्थित मुलगा मला म्हणाला, ‘पपा, यू हॅव लिव्हड् फुल लाइफ. तुम्ही पूर्ण आयुष्य जगलात. (जगलात म्हणजे? संपलं, यू मीन?) आता काळजी करू नका. लागेल ते खा. लागेल ते प्या. काय? (आता काळजी म्हणजे? परिणामांची पर्वा न करता लागेल ते खाऊ? म्हणजे बरंवाईट झालं तरी फिकीर नको. हो की नाही?)
‘नाही हो पपा.’ अमर हसत हसत म्हणाला, ‘माझं म्हणणं आहे की, तुम्ही आता तुमच्या जबाबदाऱ्यांतून मोकळे झालायत. दोन्ही मुलं मार्गी लागलीत. दोन्ही मुलं त्यांच्या क्षेत्रात ‘सेटल’ झालीत. नाऊ इज द राइट टाइम टु रेस्ट अॅण्ड एन्जॉय. ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या, पण वेळेअभावी करता येत नव्हत्या, त्या करा. वाचन करा, टीव्हीवर क्रिकेट बघा. ‘नेटफ्लिक्स’ व अॅमेझॉन’वर इंग्लिश व हिंदी चित्रपट व मालिका तुम्हाला हव्यात तेव्हा बघा. फोनवर मित्रांशी भरपूर बोला. खदखदून हसा. मला हे म्हणायचं होतं. तुम्ही नेमका मला अभिप्रेत नव्हता तो अर्थ काढलात. सो टिपिकल ऑफ युअर एज. मेडिटेशन करा. डोकं शांत होईल. माझ्याकडे यायचंय ना? आय अॅम लुपिंग फॉरवर्ड टु इट….’
माझ्या डोळय़ात एकदम पाणी आलं. अलीकडे हे वारंवार होतं. लता गाते आणि खुळय़ासारखे माझे डोळे पाणावतात. त्याशिवाय जिवाची बेचैनी कमी होत नाही. सुरेश भटांनी लिहिलं होतं-
‘याचेच रडू आले की जमले न मला रडणेही’
म्हातारपण म्हणजे अश्रू थोपवण्यासाठी केलेली जीवघेणी, अशोभनीय कसरत. कर्तृत्ववान माणसांचं म्हातारपण जास्तच केविलवाणं असतं. आपण कोण होतो व काय केलं होतं हे केवळ त्यांनाच स्मरत असतं. अल्झायमर झाला असला तर तेही स्मरत नसतं.
जसं त्या विनोदातल्या सहस्रचंद्रदर्शन झालेल्या वृद्धांना आपण हॉटेल सी व्हय़ूमध्ये यापूर्वी गेलो होतो हेच आठवत नसतं.

[email protected]