मोठय़ांच्या छोटय़ा गोष्टी – 26

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

मनात उत्साह होता, डोक्यात गोंधळ नव्हता, पायात बळ होतं, बुडाखाली मोटारसायकल होती, पेट्रोल परवडणारं होतं. मी याला भेट, त्याला भेट असं करीत सुटलो होतो. देव आनंद वगैरे माणसं हाडामांसाची आहेत हा थरार अनुभवत होतो. राजेश खन्नाला शिवी घालून बोलताना माझा उन्माद गगनाला भिडला होता. तलतच्या मांगल्याच्या पायरीवर बसून मला उन्मळून आलं होतं व त्याच भावनोत्कट अवस्थेत मी त्याला म्हणालो होतो, ‘‘गाईये साब, ‘के आज फिर मेरा दिल चाहता है रोने को, कसम तुम्हारी, ये दिल चाहता है रोने को…’’

मला गीतकार राजेंद्र कृष्णला भेटायचं होतं. मला छापण्यासाठी त्याचा पह्टो हवा होता. त्या काळी हाच राजमार्ग होता. मी पेडर रोडवरील त्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये गेलो. त्याचं मागेच (23 सप्टेंबर 1987) निधन झालं होतं. त्याची सून भेटली. मी बोलता बोलता सहज राजेंद्र कृष्णच्या काही संस्मरणीय गाण्यांचा उल्लेख केला. तिच्या चेहऱयावर कुतुहल, आनंद, आश्चर्य आणि काय काय भाव होते. तेवढय़ात तिथं आलेल्या नवऱयाला ती म्हणाली, ‘‘ये सब गाने बाबूजीने लिखे थे क्या?’’ राजेंद्र कृष्णचा मुलगा तेवढाच अंधारात दिसला. त्या घरातून जणू राजेंद्र कृष्णचे अस्तित्व पुसलं गेलं होतं. त्यानं स्वकमाईवर कमावलेला फ्लॅट मात्र त्यांना चालत होता.
‘‘राजेंद्र कृष्णचा पह्टो मला मिळू शकेल का?’’ मी चाचरत विचारलं. मुलानं व सुनेनं एकमेकांकडे पाहिलं. मला कशाला फोटो हवाय त्यांना कळतच नव्हतं. फोटो कुठे मिळेल त्यांना माहीतच नव्हतं.
‘‘तुम्ही काही दिवसांनी पुन्हा या’’ राजेंद्र कृष्णचा मुलगा म्हणाला, ‘‘दरम्यान आम्ही फोटो शोधून ठेवतो.’’
माझ्यावर पुन्हा त्यांच्याकडे जायची वेळ आली नाही. मला फोटो मिळाला. त्यांनी फोटो शोधला असल्यास व तो त्यांना सापडला असल्यास आता तो कुठे निर्दालावा? असा प्रश्न त्यांना पडला असेल. राजेंद्र कृष्ण, मदन मोहन व लता मंगेशकर या तिघांची अजूनही कायम असलेली जादू बघा. चित्रपट ‘अदालत,’ पडद्यावर नर्गिस-
जाना था हमसे दूर बहाने बना लिये
अब तुमने कितने दूर ठिकाने बना लिये..
रुखसत के वक्त तुमने जो आँसू हमे दिये
उन आँसुओं से हम फसाने बना लिये…
दिल को मिले जो दाग जिगर को मिले जो दर्द
इन दौलतों से हम खजाने बना लिये…
राजेंद्र कृष्ण हरफनमौला होता. तो कथाकार, पटकथाकार, कवी सबकुछ होता. त्याचा जन्म 6 जून 1919 रोजी पंजाबमध्ये जलालपूर जट्टा (आता पाकिस्तानात) येथे झाला. सत्तेचाळीस साली त्यानं ‘जनता’ नावाच्या चित्रपटाची पटकथा लिहिली. त्यानंतर ‘जंजीर’ नामे चित्रपटात गाणी लिहिली. दोन्ही फ्लॉप ठरले. त्यानंतर मात्र त्याला अकस्मात मटका लागला. ‘‘सुनो सुनो ऐ दुनियावालो बापू की ये अमर कहानी’ या त्याच्या लेखणीतून निपजलेल्या गीतानं देशभर धुमाकूळ घातला. संगीत होतं हुस्नलाल-भगतरामचं. गाण्याची पुढची ओळ होती, ‘अपनेही हाथों से हमने अपना बापू खोया.’ आवाज महमद रफीचा होता.

त्यानंतर राजेंद्र कृष्णनं मागे वळून पाहिलं नाही. सी. रामचंद्र व मदन मोहनचा तो लाडका गीतकार होता. हे कमी झालं म्हणून की काय, त्याला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा ‘जॅकपॉट’ लागला. त्या काळचे अठ्ठेचाळीस लाख. त्याची रेसबाजी फळाला आली. तामीळ भाषेवर त्याची हुकुमत होती. त्यानं अनेक तामीळ चित्रपट लिहिले. त्यात एव्हीएमचे अठरा चित्रपट होते.

‘आझाद’ची गाणी तयार करण्यासाठी त्याला व जिगरी यार सी. रामचंद्र याला निर्मात्यांनी मद्रासमध्ये हॉटेलात आणून ठेवलं. तिसरा यार ओम प्रकाश हाही आला. मग काय मिल बैठे तीन यार, धमालच धमाल! नुसत्या खाण्यापिण्यात त्यांनी वेळ दवडला. शेवटी परत जाण्याची वेळ आली तेव्हा ते खडबडून जागे झाले. त्यांनी कामाला हातही लावलेला नव्हता. आता मात्र त्यांनी मनावर घेतलं. राजेंद्र कृष्ण लिहीत गेला व सी. रामचंद्र त्या गीतांना चाली देत राहिला. चारसहा दिवसांत ‘आझाद’चं संपूर्ण संगीत तयार झालं.

बघा तर जरा गाणी-
‘कितनी जवाँ है रात’- लता मंगेशकर
‘जारी जारी ओ कारी बदरिया’- लता मंगेशकर
‘देखो जी बहार आयी’ – लता मंगेशकर
‘कितना हँसी है मौसम’ – लता-रामचंद्र चितळकर
‘राधा ना बोले ना बोले’ – लता मंगेशकर
‘अपलम चपलम चपलाई रे’ – लता-उषा मंगेशकर
‘मरना भी मुहोब्बत में किसी काम न आया’ – रघुनाथ यादव व कोरस
‘ओ बलिये’- लता-उषा मंगेशकर
‘कभी खामोश रहेते है’ – लता मंगेशकर
याच राजेंद्र कृष्णनं ‘यूँ हसरतों के दाग’ (‘अदालत’- लता) मध्ये म्हटलं होतं-
घर से चले थे हम तो खुशी की तलाश में
गम राह में खडे थे, वोही साथ हो लिये
दिव्यत्वाचा साक्षात्कार झालेल्या राजेंद्र कृष्णच्या लेखणीतून उतरलेली ही काही गाणी डोळय़ांखालून व जमल्यास कानांवरून जाऊ द्या.
‘बहारे फिर भी आयोगी’- ‘लाहोर’ – श्यामसुंदर- लता
‘ये जिंदगी उसी की है’- अनारकली- सी. रामचंद्र-लता
‘कदर जाने ना’ – ‘भाई भाई’- मदन मोहन- लता
‘कहाँ हो कहाँ मेरे जीवन सहारे’ – ‘संगदिल’- सज्जाद हुसेन- तलत
‘मै पागल मेरा मनवा पागल-’ ‘आशियाना’ – मदन मोहन- तलत
‘मुहोब्बत में ऐसे जमाने भी आये’- ‘सगाई’ – सी. रामचंद्र- तलत-लता
‘बेरहेम आसमा’- ‘बहाना’- मदन मोहन- तलत मेहमूद
अन् अशा या गुणाढय़ राजेंद्र कृष्णची त्याच्या घरातच पिंमत नव्हती. दिलीप कुमारची नातवंडं, पणतवंडं असती तर त्यांनीही विचारलं असतं- ‘अब्बूमियाँ फिल्मो में काम करते थे क्या?’…

[email protected]