शिरीषायन – सवाल माझा ऐका!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

  •  कर्णधार विराट कोहलीनं इंग्लंडविरुद्ध चार कसोटी सामन्यांत 31.14 धावांच्या सरासरीनं 218 धावा केल्या. याला यशस्वी म्हणायचं की अयशस्वी?
  • पाचव्या कसोटी सामन्यात उपकर्णधार अजिंक्य रहाणे खेळू शकला नाही, कारण पाचवा सामना खेळलाच गेला नाही. याचा अर्थ त्याची कारकीर्द संपली म्हणायचं की हिंदुस्थानी खेळपट्टय़ांवर तो नव्यानं ‘गार्ड’ घेईल?
  • अश्विन मालिकेतील एकाही सामन्यात खेळला नाही, कारण कोहलीनं त्याचा खेळणाऱ्या संघात समावेश केला नाही. आता तीन वर्षांनी अश्विनची ‘वर्ल्ड कप’साठी टी-20 संघात निवड झाली आहे. पण याचा अर्थ कोहली त्याला खेळवेल असा घ्यायचा का?
  • पंत बेदम फटकेबाजी करीत नाही तोवर तो पंतच वाटत  नाही, हा या मालिकेतून निष्कर्ष काढावा का?
  • शार्दूल ठाकूरनं इंग्लंडच्या दुसऱ्या डावात कर्णधार रूटसह दोन विकेटस् काढल्यावर व दोन्ही डावांत दणदणीत अर्धशतके ठोकल्यावर टी-20 संघात त्याची केवळ राखीव खेळाडूंत वर्णी लागू शकते का?
  • हनुमा विहारी संघात केवळ (अश्विन शेजारची) खुर्ची उबवण्यासाठी घेतात का?
  • मयंक अगरवाल केवळ बदली क्षेत्ररक्षक म्हणून निवृत्त होणार का?
  • रोहित शर्मासारखा जातिवंत ‘स्ट्रोक प्लेयर’ कसोटी सलामीवीर म्हणून यापुढे कायम तटरक्षक, बचावखोर भूमिकेत राहणार का?
  • अखेरच्या दोन सामन्यांतील शैलीदार, आक्रमक फलंदाजीबद्दल माहेरी सौराष्ट्रला परत गेल्यावर चेतेश्वर पुजाराला चौकशीला सामोरं जावं लागेल का?
  • कर्णधार कोहली व उपकर्णधार रहाणे यांनी दाढी वाढवल्येय म्हणून तूही वाढवू शकतोस असं नाही, अशी राहुलला तंबी देऊन त्याची एअरपोर्टवर भादरण्यात येईल का?
  • अश्विन, पंत, यादव व सामी यांना गुळगुळीत दाढी केल्याबद्दल एकापाठोपाठ एक संघातून डच्चू देण्याचा विचार आहे का?
  • निवृत्तीनंतर किंवा संघातून बाहेर झाल्यानंतर रहाणे शिवाजी मंदिरला हरी पाटणकरशेजारी बुकिंगला बसेल का? (त्याचे वडील नाटय़ व्यावसायिक आहेत.)
  • जडेजा व अश्विन यांच्यातील स्पर्धेचा मुद्दा दाढी हा आहे का? (Is the bone of contention beard? – वृद्धीमान सहासाठी इंग्रजीत.)
  • जसप्रीत बुमराहची मातृभाषा काय? – बंपर, यॉर्कर की रिव्हर्स स्विंग?
  • यापुढे इशांत शर्माचा उपयोग केवळ फळीवरचा डबा काढण्यासाठी का?
  • उमेश यादवला खेळवतायत की नाही, या मैत्रिणींच्या व शेजारणी-पाजारणींच्या प्रश्नाला उत्तर देता देता उमेशपत्नी तान्या भंडावून गेली असेल.
  • एकतरी घटस्फोटित खेळाडू संघात हवा म्हणून सामीला संघात घेत असतील का?
  • केदार जाधव, मनीष पांडे, अंबाती रायडू, यजुवेंद्र चहल, शिखर धवन, कुणाल पंडय़ा यासारख्या वगळलेल्या खेळाडूंतून एक संघ उभा करण्याची व अश्विनला त्याचा कर्णधार करण्याची कल्पना कशी वाटते? युवराज सिंग मॅनेजर व युसूफ पठाण ‘कोच.’
  • पृथ्वी शॉला खेळवायचंच नसेल तर त्याला अश्विनच्या मांडीवर दत्तक पुत्रासारखं बसवण्यापेक्षा त्याला हिंदुस्थानचा ‘रोव्हिंग अँबॅसेडर’ बनवून दौऱयावर का नेत नाही?
  • आपला शेवटचा त्रिशतक काढणारा कसोटीवीर करुण नायर याला नुसता प्रतिपक्षाला दाखवायला म्हणून का बरोबर घेऊन जात नाहीत?
  • ‘राऊंड आर्म’ व ‘अंडर आर्म’ यांच्या मधली गोलंदाजी करणारा केदार जाधव होता. आता सरपटी गोलंदाजी करणारा गोलंदाज शोधावा का?
  • राहुल, पंत (आणि आता इशान किशन) हे यष्टीरक्षक एकाच संघात चालतात; मग एक जागतिक कीर्तीचा फिरकी गोलंदाज का चालत नाही?
  • रवी शास्त्रींच्या पुस्तकाचं इंग्लंडमध्ये समारंभपूर्वक प्रकाशन झालं तेव्हा त्याला ‘कोरोना’ झाल्याचं सांगतात. माफ करा, पण रवी शास्त्रीनं पुस्तक लिहावं असं त्याचं कर्तृत्व काय?
  • विश्वनाथप्रमाणेच सचिन तेंडुलकरला टी.व्ही.वर कॉमेंटेटर म्हणून का बोलावत नाहीत? (प्रत्येकानं आपापलं उत्तर शोधावं).
  • विश्वचषक टी-20 संघाचा ‘मेंटॉर’ (डिक्शनरीतील अर्थ ‘विश्वासू सल्लागार’) म्हणून धोनीची नियुक्ती केली गेल्येय, त्याचे शास्त्रीनं स्वागतही केलंय, पण त्यापेक्षा धोनीला संघातून खेळवणे फायदेशीर व हुशारीचं झालं नसतं का?

[email protected]