
>>शिरीष कणेकर
दादा कोंडकेशी माझी मैत्री कधी, कुठे व कशी झाली आता स्मरत नाही. यादें धुंदलीसी हो गई है। दादा असते तर म्हणाले असते, ‘हो, पण मैत्री कधी होती आपली?’ समोरच्याची टोपी उडवून ती पायदळी तुडवणे यात दादांचा हातखंडा होता. ते नसलेली टोपी माझ्या डोक्यावर चढवायचे व मग ती उडवून लाथाडायचे.
ज्येष्ठ चित्रपट समीक्षक इसाक मुजावर यांचे दादांशी घनिष्ट संबंध होते. माझे मुजावरांशी तसेच घनिष्ट संबंध होते. त्यातूनच माझे दादांशी सूर जुळले असावेत. आम्ही तिथं अनेकदा एकत्र भेटलो, पण का कुणास ठाऊक पत्त्यांचा ‘पाच-तीन-दोन’ डाव खेळलो नाही. दादा सिनेमा नावानं पत्त्यांचा बंगला उभा करीत होते, पण तो कधी कोसळत नव्हता. दादांचा एकखांबी तंबू मजबूत होता.
एकदा मी माझ्या एकपात्रीच्या दौऱयावर निघत होतो. आपण बघा, कुठे लांब निघालो की, एक गरम चहा मारून कूच करतो. मी तेच करीत होतो. बायको (माझ्या सासूची सख्खी मुलगी) माझ्यासाठी चहा घेऊन येताना ठेचकाळली. (नवरा दळभद्री मिळाल्यावर दुसरं काय होणार?) तिच्या हातातला उकळता चहा माझ्या कंबरेवर पडला. मी बोंबलत सुटलो. (माझ्या सासरची मंडळी तिथं असती तर टाळय़ा वाजवून त्यांनी त्या दुर्घटनेचं स्वागत केलं असतं.) तेवढय़ात फोन वाजला. फोनचं असं असतं की तो केव्हाही वाजला तरी कुठल्याही परिस्थितीत आपण तो उचलतो. मी तो उचलला. फोनवर दादा होते. ठणाणा करीत मी त्यांना झाला प्रकार सांगितला.
‘मला वाटलंच होतं हं.’ दादा वदले, ‘मी माझ्या लोकांना नेहमी सांगायचो की या शिरीष कणेकरला त्याची बायको एक अन् एक दिवस जाळून मारणार. शेवटी झालंच तसं.’
मी एकाच वेळी विव्हळत व हसत दादांच्या वक्तव्याला दाद दिली.
एकदा दादांनी अकस्मात मला विचारलं, ‘कणेकर, तुमचा मुलगा दत्तक घेतलेला आहे का हो?’
‘आँ?’ मी उडालो, ‘नाही पण असं का विचारलंत?’
‘तसं नाही पण तो खूप हुशार आहे म्हणून मला प्रश्न पडला.’ दादांनी लगावून दिली. ‘लगावबत्ती’ हे माझ्या एका पुस्तकाचं नाव आहे, पण ते नाव दादांच्या आत्मचरित्राला जास्त शोभलं असतं.
‘दादा, तुम्ही लग्न का नाही केलंत?’ मी एकदा ‘दादा’गिरी करीत त्यांना विचारलं.
‘कशासाठी? मीपण तुमच्यासारखंच दुःखी व्हावं व पश्चात्ताप करावा असं तुम्हाला वाटतं का?’ दादांनी प्रतिप्रश्न केला. मी मनातल्या मनात स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली व मनाला बजावलं की, दादा कोंडके एकच आहेत, दादा व्हायचा प्रयत्न करू नकोस.
संपादक (पै.) माधव गडकरी यांच्या इच्छेनुसार मी त्यांची व दादांची माझ्या घरी भेट घडवून आणली. आतून छान छान खायचं बाहेर येत होतं. शेवटी दादा कळवळून म्हणाले, ‘अरे, मला कोणी एक कप चहा देईल का?’
दादा चहाबाज होते. त्यामुळेच त्यांना निद्रानाशाचा आजार जडला असावा. त्यांनी तो सेन्सॉर बोर्डालाही लावून दिला. दादांच्या अनेक गाण्यांच्या तालमींना मी हजर होतो. त्यांच्या गाण्यांचे मुखडे ऐकून माझ्या शेंडीला झिणझिण्या यायच्या. सेन्सॉरचं काय होत असेल? दादांची चित्रपट व त्यातली गाणी सेन्सॉरकडे येतायत म्हटल्यावर सेन्सॉर सदस्य पार्श्वभागाला पाय लावून सैरावैरा पळत असतील. दादांना गाणी सुचायची तीच द्विअर्थी सुचायची. अशाच एका गाण्याशी संदर्भात दादांचा सेन्सॉरशी वाद झाला. दादांनी एका नामवंत कवयित्रीचं गाणं समोर टाकलं व त्याचा अश्लील अर्थ सांगितला. सेन्सॉर दिग्मुढ झालं. त्या कवयित्रीच्या कानावर हे गेलं तेव्हा ती साहजिकच उखडली. दादांना काही देणंघेणं नव्हतं. त्यांचा चित्रपट ओरखडा न निघता तसाच्या तसा प्रेक्षकांपर्यंत जायला हवा एवढंच त्यांना कळत होतं.
हांडे-पाटील नावाचे सधन शेतकरी आपला धंदा वाऱयावर सोडून दादांच्या भजनी लागले होते. ते दादांचे भक्त-मित्र-सहकारी सगळं काही होते. ‘मेरी प्यारी बकरी है लाखों में एक’ (चित्रपट ‘तेरे मेरे बीच में’) या गाण्याच्या रिहर्सलला मी हांडे-पाटलांना तोंडानं तबला वाजवताना व बकरीचा आवाज काढताना ऐकलं होतं. एकदा ते दादांना म्हणाले, ‘दादा, तुम्ही झोपलेले असताना एक आडमाप माणूस तुम्हाला भेटायला आला होता. मी त्याला पिटाळून लावला.’
अधिक चौकशीअंती दादांना कळले की, हांडे-पाटलांनी पिटाळून लावलेला आडमाप माणूस कपिल देव होता.
हार्टअॅटॅकनंतर दादा हिंदुजाला अॅडमिट होते. मी समाचाराला गेलो. दादा मला म्हणाले, ‘मनमोहन देसाई अमिताभसाठी व माझ्यासाठी नवस बोललाय. बघू रेखा आता आमच्यासाठी काय करत्येय…’





























































