डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स  अजिंक्य; कुमार गटात बंडय़ा मारुतीची जेतेपदाची झेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवोदित संघाने सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित स्पर्धेच्या कुमार गटात बंडय़ा मारुती सेवा मंडळाने जय दत्तगुरू संघाचा 26-25 असा अवघ्या एका गुणाने पराभव करीत जेतेपदाची झेप घेतली आणि नवोदित कबड्डी चषकावर आपले नाव कोरले. महिलांच्या अंतिम लढतीत डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने हम किसीसे कम नहीं असे सिद्ध करताना शिवशक्ती संघाचा 38-26 असा फडशा पाडला.  कुमार गटातील अंतिम सामना चुरशीचा झाल्यामुळे मध्यंतराला बंडय़ा मारुतीकडे 16-13 अशी आघाडी होती. जय दत्तगुरूने जोरदार लढत देत तोडीस तोड खेळ केला. त्यामुळे सामना अक्षरशः बरोबरीत पुढे सरकत होता. अखेरच्या क्षणी बंडय़ा मारुतीने बाजी मारली.  विजयी संघाच्या प्रणीत देसाई, रोहित सहानी यांनी बहारदार खेळ केला.

महिला गटाच्या अंतिम लढतीत डॉ. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबने आपल्या लौकिकास साजेसा तुफानी खेळ करीत सुरुवातीपासूनच लढतीवर आपले वर्चस्व कायम राखले होते. त्यामुळेच त्यांनी मध्यंतरासच शिवशक्तीवर 19-12 अशी 7 गुणांची आघाडी मिळवली आणि उत्तरार्धातही तोच जोश कायम राखत 12 गुणांच्या फरकाने शिवशक्तीला आपली शक्ती दाखवून दिली. शिरोडकरच्या यशात मेघा कदम आणि साक्षी सावंत यांनी दमदार खेळ केला.